संगणक परिचालकांचा मोर्चा
By Admin | Updated: July 22, 2014 00:50 IST2014-07-22T00:40:19+5:302014-07-22T00:50:47+5:30
संगणक परिचालकांचा मोर्चा

संगणक परिचालकांचा मोर्चा
नाशिकरोड : संगणक परिचालकांना शासकीय सेवेत समाविष्ट करून वेतनश्रेणी लागू करावी आदि विविध मागण्यांसाठी संगणक परिचालक कामगार संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
संगणक परिचालक कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी दुपारी रेल्वेस्थानक येथील आंबेडकर पुतळ्यापासून विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना देण्यात आलेल्या निवेदनात ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांना शासकीय सेवेत समाविष्ट करून वेतनश्रेणी लागू करावी, ग्रामपंचायतमधील संग्राम कक्षात कार्यरत संगणक परिचालकांना कराराप्रमाणे आठ हजार रुपये वेतन देण्यात यावे, बैठक भत्ता व प्रवास भत्ता देण्यात यावा, ठरलेल्या कंत्राटी कराराप्रमाणे मानधन फरक व थकीत मानधन त्वरित देण्यात यावे, जीवन विमा, भविष्य निर्वाह निधी, राहणीमान व महागाई भत्ता लागू करण्यात यावा, राज्य शासन घोषित पंचायत विकास अधिकारी हे पद स्वतंत्ररीत्या न भरता या पदावर संगणक परिचालकाची नियुक्ती करावी, संगणकाची देखभाल दुरुस्ती व छपाईसाठी लागणारे साहित्य वेळेवर उपलब्ध करून देण्यात यावे, सर्व ग्रामपंचायतींना ब्रॉड बॅण्ड इंटरनेट सर्व्हिस देण्यात यावी आदि मागण्या करण्यात आल्या आहेत.
मोर्चामध्ये राजू देसले, योगेश नवले, हेमंत पगारे, राकेश देशमुख, सुरेश पाटील, सुकुमार दामले, शांताराम बेंडकुळे, बापू मोरे, नरेंद्र बेलदार, अर्चना जाधव, प्रिया सोनवणे, सचिन संगमनेरे, सागर इप्पर, अनिल घुमरे, योगेश शेवरे आदिंसह संगणक परिचालक मोर्चात सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)