पॅनकार्ड क्लब कंपनीच्या विरोधात मोर्चा
By Admin | Updated: April 28, 2017 02:26 IST2017-04-28T02:26:17+5:302017-04-28T02:26:34+5:30
पॅनकार्ड क्लब कंपनीच्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नागरिक संघर्ष समितीतर्फे मोर्चा काढण्यात येईल. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना याबाबत निवेदन देण्यात आले.

पॅनकार्ड क्लब कंपनीच्या विरोधात मोर्चा
पंचवटी : शेकडो गुंतवणूकदारांना ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये जमा करून मुदत संपल्यानंतरदेखील गुंतवणूकदारांच्या ठेवी परत देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पॅनकार्ड क्लब कंपनीच्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नागरिक संघर्ष समितीतर्फे निमाणी बसस्थानक ते पंचवटी पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढण्यात येईल. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
पंचवटीतील निमाणी बसस्थानकासमोरील सूर्या आर्केड इमारतीत पॅनकार्ड क्लब कंपनीचे कार्यालय असून गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये जमा करून घेतले आहेत. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलेल्या ठेवीची मुदत संपून दीड ते दोन वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरदेखील कंपनी गुंतवणूकदारांना पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहे. मुदत संपल्याने पैसे परत मिळावे यासाठी गुंतवणूकदारांनी अनेकवेळा मुंबईतील मुख्य कार्यालयात जाऊन संपर्क साधला, मात्र तेथेही विविध कारणे सांगून टाळाटाळ करण्यात आली. गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत जवळपास अडीच हजार गुंतवणूक दारांनी अंदाजे वीस ते पंचवीस कोटी रुपये रक्कम पॅनकार्ड क्लब कंपनीत गुंतवणूक केले आहेत. पॅनकार्ड क्लब कंपनीत गुंतवणूकदारांनी आपल्या पाल्यांचे शिक्षण तर कुणी मुला- मुलींच्या लग्नासाठी पैसे जमा केले होते, मात्र मुदत संपली तरी पैसे मिळाले नसल्याने गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला लागला आहे. (वार्ताहर)