मैत्रीचे स्नेहबंध होणार दृढ..
By Admin | Updated: August 1, 2015 23:37 IST2015-08-01T23:35:38+5:302015-08-01T23:37:43+5:30
.आज मैत्रीदिन : उत्साहाला उधाण

मैत्रीचे स्नेहबंध होणार दृढ..
नाशिक : एकमेकांच्या मनगटांवर बांधले जाणारे फ्रेण्डशिप बॅण्ड... गप्पांची मस्त मैफल अन् साथीला हिरवागार निसर्ग... अशा वातावरणात उद्या (दि. २) शहरातील तरुणाई मैत्रीदिन साजरा करणार आहे. मैत्रीदिनाच्या सेलिब्रेशनचे नियोजन आज दिवसभर सुरू होते. तरुणाईच्या उत्साहाला व्हॉट्स अॅप व अन्य सोशल मीडियामुळे चांगलेच उधाण येण्याची चिन्हे आहेत.
आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्रीदिन साजरा केला जातो. विशेषत: महाविद्यालयीन तरुणाई हा दिवस अत्यंत जल्लोषात साजरा करते. मित्र-मैत्रिणी एकत्र येऊन एकमेकांना ‘फ्रेण्डशिप बॅण्ड’ बांधून शुभेच्छा देतात. हा दिन साजरा करण्याचे नियोजन आज सुरू होते. फेसबुक, व्हॉट्स अॅपवर आजपासूनच संदेशांची देवाणघेवाण सुरू झाली होती. गंगापूररोड, शरणपूररोड, कॉलेजरोड भागातील कॉफी शॉप, चाट सेंटर्स, स्नॅक्सची दुकाने,आइस्क्रीम पार्लर्स उद्या गजबजून जाणार आहेत. याशिवाय सोमेश्वर, पांडवलेणी, खंडोबा टेकडी, गंगापूर धरण, आसारामबापू आश्रम परिसर आदि ठिकाणांवरही तरुणाईची गर्दी होणार आहे. ‘फे्रण्डशिप डे’निमित्त उद्या कॉलेजरोडसह अन्य महत्त्वाच्या ठिकाणांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे.