व्हॉट्स अॅपवर स्वातंत्र्याचा जल्लोष
By Admin | Updated: August 14, 2016 23:27 IST2016-08-14T23:26:28+5:302016-08-14T23:27:52+5:30
जागर देशभक्तीचा : भारतीय माहितीची ‘पोस्ट’ ठरली हिट

व्हॉट्स अॅपवर स्वातंत्र्याचा जल्लोष
नाशिक : व्हॉट्स अॅपवर सर्वच ग्रुपच्या ‘डीपी’वर भारतीय ध्वज झळकला. ‘बलसागर भारत होवो...’, ‘विश्वात शोभुनी राहो...,’ ‘मेरी मिट्टी से भी खुशबु ए-वतन आयेंगी... अशा एकापेक्षा एक सरस ‘स्टेटस’ नेटिझन्सने ठेवले आणि २४ तासांअगोदर स्वातंत्र्याच्या जल्लोषाला रविवारी (दि.१४) प्रारंभ झाला.
७०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नेटिझन्सनेही सोशल मीडियावर देशभक्तीचा जयजयकार सुरू केला आहे. एकापेक्षा एक देशभक्तीपर लघुसंदेश, तिरंग्याच्या छायाचित्रांची देवाणघेवाण सुरू झाली. भारताशी संबंधित सामान्यज्ञानात भर टाकणाऱ्या माहितीची ‘पोस्ट’ सर्वाधिक हिट झाली. शहरातील सर्वच व्हॉट्स अॅप ग्रुपवर तिरंगा फडकत होता आणि एकापेक्षा सरस माहिती, शायरीच्या लघुसंदेशांची ‘पोस्ट’ सर्वत्र फिरत होती. काही ग्रुपवर भारताचा आदर, मान, सन्मान करण्यासाठी सिग्नल पाळा, उघड्यावर कचरा टाकू नका, वृक्ष तोडू नका, धूम्रपान करू नका, सैन्यदलाबाहेर राहूनही देशसेवा करू शकतात आणि एक जागरूक भारतीय म्हणून भूमिका बजावू शकतात, अशी प्रबोधनपर पोस्ट व्हायरल झाली. ‘देशप्रेम कृतीतून झळकायला हवे, केवळ व्हॉट्स अॅपचे डीपीवर तिरंगा लावून किंवा शब्दसंभार असलेले वाक्य स्टेटस ठेवून देशप्रेम व्यक्त होत नाही, तर देशासाठी आपण काय योगदान देतो ते जास्त महत्त्वाचे आहे. जानेवारीची २६ तारीख आणि आॅगस्टच्या १५ तारखेपुरतेच देशप्रेम मर्यादित ठेवणे योग्य नाही’ अशा उपरोधिक पोस्टही विविध ग्रुपवर शेअर केल्या जात होत्या. स्वातंत्र्यदिनाचा हा उत्साह सोमवारी (दि.१५) अधिक द्विगुणित झालेला असेल.