स्वातंत्र्यप्रेम; मात्र ध्वजाविषयी अपुरे ज्ञान
By Admin | Updated: August 14, 2016 23:42 IST2016-08-14T23:38:45+5:302016-08-14T23:42:00+5:30
सर्वेक्षण : रंग, संख्येवर आधारित प्रश्नांची उत्तरे सांगणे कठीण

स्वातंत्र्यप्रेम; मात्र ध्वजाविषयी अपुरे ज्ञान
स्वप्नील जोशी नाशिक :
तिरंगा ध्वजाचे तीन रंग कोणते, त्या रंगांचा आशय काय आणि अशोकचक्राला किती आरा आहेत... म्हणायला तीन सोपे प्रश्न...परंतु देशाचा ६९ वर्धापन दिन असतानादेखील त्याविषयी अनेक जण अनभिज्ञ आहेत. लोकमतने स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेल्या सर्वेक्षणात ही बाब आढळली आहे.सोमवारी १५ आॅगस्ट साजरा होणार असून, अशा दिवशी सर्वांनाच देशप्रेम आठवते. सोशल मीडियावर तर शुभेच्छांची मोठ्या प्रमाणात देवाण-घेवाण होत असते. मात्र असा राष्ट्राभिमान बाळगताना त्यातील साऱ्याच बाबी माहीत असणे गरजेचे आहे. किंबहुना मूलभूत माहितीही नसल्याचे आढळते. ‘लोकमत‘च्या वतीने पन्नास जणांच्या सर्वेक्षणात प्रकर्षाने ही बाब जाणवली.
१५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी हे दोन राष्ट्रीय सणच आहेत, परंतु स्वातंत्र्यदिन कोणता प्रजासत्ताक दिन कोणता असेही अनेकांना सांगता येत नाही. विशेषत: नव्या पिढीत जेथे स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या वर्गामुळे जगाचे ज्ञान मिळते असा एक वर्ग असताना दुसरीकडे असाही युवा वर्ग आहे की त्याला पुरेसे ज्ञान नाही. लोकमतने सर्व्हे करताना युवक, युवती आणि गृहिणी अशा वेगवेगळ्या घटकांना तीन प्रश्न विचारलेत आणि त्यांना देशाच्या स्वातंत्र्याविषयी प्रेम असले तरी प्रत्यक्षात मात्र राष्ट्रध्वजाविषयी कितपत ज्ञान आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रध्वजातील रंगाची क्रमवारी, या तिन्ही रंगांचे महत्त्व आणि अशोकचक्रात किती आऱ्या आहेत, हे तीन साधे सोपे प्रश्न होते. पैकी रंगाची क्रमवारी सांगणे सोपे असले तरी त्यातही पंधरा टक्के नागरिकांना क्रमवारी सांगता आली नाही. रंगाचे महत्त्व सांगताना ३५ टक्के नागरिकांना ते सांगता आले नाही. राष्ट्रध्वजातील अशोकचक्रावरील आऱ्या किती याबाबत चाळीस टक्के व्यक्तींना सांगता आले नाही.