स्वातंत्र्यसैनिकांच्या विवाहित मुलींनाही नोकरीत सवलत शासनाचा निर्णय : जवळचे नातेवाईक संज्ञेत समावेश
By Admin | Updated: May 27, 2014 01:36 IST2014-05-27T00:11:34+5:302014-05-27T01:36:02+5:30
नाशिक : स्वातंत्र्यसैनिकांच्या विवाहित मुलींनाही आता शासन सेवेत नियुक्तीसाठी असलेल्या सवलती मिळणार असून, तसा शासननिर्णय जारी करण्यात आला आहे. शासनाने हा निर्णय जारी केला असला, तरी किती जणांना याचा प्रत्यक्षात लाभ मिळेल याबाबत साशंकताच आहे.

स्वातंत्र्यसैनिकांच्या विवाहित मुलींनाही नोकरीत सवलत शासनाचा निर्णय : जवळचे नातेवाईक संज्ञेत समावेश
नाशिक : स्वातंत्र्यसैनिकांच्या विवाहित मुलींनाही आता शासन सेवेत नियुक्तीसाठी असलेल्या सवलती मिळणार असून, तसा शासननिर्णय जारी करण्यात आला आहे. शासनाने हा निर्णय जारी केला असला, तरी किती जणांना याचा प्रत्यक्षात लाभ मिळेल याबाबत साशंकताच आहे.
१९८५ च्या शासननिर्णयात स्वातंत्र्यसैनिकावर अवलंबून असलेले जवळचे नातेवाईक कोण याबाबत स्पष्टता करण्यात आलेली आहे. त्यामध्ये जवळचे नातेवाईक या संज्ञेत स्वातंत्र्यसैनिकाच्या विवाहित मुलीचा समावेश करण्यात आलेला नव्हता. यासंदर्भात श्रीमती मीना दिनकर देशमुख तथा श्रीमती मीना संजय बावस्कर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने १३ फेबु्रवारी २०१२ रोजी निकाल देत स्वातंत्र्यसैनिकाचा जवळचा नातेवाईक म्हणून त्याच्या विवाहित मुलीचादेखील समावेश करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार सदर प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन होता. त्यानुसार शासनाने १९ मे २०१४ रोजी शासननिर्णय जारी करत स्वातंत्र्यसैनिक अथवा त्याचे नामनिर्देशित पाल्य यांना शासन सेवेतील नियुक्तीकरिता असलेल्या सवलतींसाठी त्याच्या विधवा पत्नी अथवा त्याच्या विवाहित मुलीसही नामनिर्देशित करण्यास मान्यता दिली आहे. सदर आदेश हे शासकीय-निमशासकीय सेवा, शासनाचे उपक्रम, महामंडळे, मंडळे, शासन अनुदानित संस्था व ज्यांना मार्गदर्शक सूचना देण्याचा अधिकार शासनाला आहे अशा सर्व संस्था व सेवा यामधील नियुक्त्यांसाठी लागू राहणार आहे. शासनाचे उपसचिव दि. रा. डिंगळे यांच्या स्वाक्षरीने नुकताच हा आदेश निर्गमित झाला आहे. स्वातंत्र्यसैनिकाचा वारस असलेल्या मुलासच शासन सेवेतील नियुक्तीत सवलतीचा लाभ दिला जात होता; परंतु ज्यांना मुलीच आहेत पण त्या विवाह होऊन सासरी गेल्या असतील त्यांना या लाभापासून वंचित राहावे लागत होते. शासनाच्या या निर्णयाने स्वातंत्र्यसैनिकांच्या विवाहित मुलींना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, शासननियुक्तीबाबत एकूणच नियम व निकष पाहता वयोमर्यादा उलटून गेलेल्या अनेक विवाहित मुलींना त्याचा कितपत लाभ मिळेल याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.