साडेतीनशे बसेसमध्ये मोफत वायफाय सेवा
By Admin | Updated: March 16, 2017 16:18 IST2017-03-16T15:44:17+5:302017-03-16T16:18:45+5:30
एसटी बसचा कंटाळवाणा प्रवास आता सुखकर ठरू लागला आहे.

साडेतीनशे बसेसमध्ये मोफत वायफाय सेवा
ऑनलाइन लोकमत/ भाग्यश्री मुळे
नाशिक, दि. 16 - आवडती गाणी, अथवा आवडता चित्रपट किंवा कामाच्या व्यवधानांमुळे हुकलेल्या एखाद्या मालिकेचा भाग... असे सर्व आता बसमध्ये सफर करतानाच प्रवासी बघत आहेत त्यातून एसटी बसचा कंटाळवाणा प्रवास आता सुखकर ठरू लागला आहे. राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी साडे तीनशे बसमध्ये मोफत वायफाय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे एसटी भरभराटीला लागण्याची चिन्हे आहेत.
सामान्यत: एसटीचा प्रवास हा धक्के खात उभे राहण्यातच असतो. बसमध्ये प्रवास करणे हा कंटाळवाणे ठरते. ग्रामीण भागात नागरीकांना बसशिवाय पर्यायच नसतो. परंतु आता परिवहन महामंडळाने ही स्थिती बदलली आहे. वायफायच्या माध्यमातून मिळणा-या सेवेमुळे प्रवासी आकर्षित होत आहेत. वायफाय बॉक्स बसवलेल्या बसमध्ये प्रत्येक प्रवाशाच्या आसनावर ते वापरण्याविषयीच्या सूचना सविस्तरपणे दिल्या आहेत.
त्यानुसार एकदा प्रवाशाचा स्मार्टफोन त्यावर लॉगीन झाल्यानंतर त्याला कायमस्वरुपी वायफायचा आनंद घेता येत आहे. या सुविधेमुळे प्रवासात मनोरंजनाचा लाभ घेता येत असल्याने अबालवृद्ध प्रवासी, वाहक यांनीही सुखावले आहेत. या सुविधेअंतर्गत प्रवाशांना लोकप्रिय हिंदी मराठी चित्रपट, लोकप्रिय हिंदी-मराठी मालिका, मराठी नाटक, जुनी नवीन गाणी पाहता येत आहे.
शहर बस, लांब पल्लयाच्या बस, साध्या, वातानुकुलित अशा सर्व बसमध्ये ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून आवडीचा कार्यक्रम सुरु केल्यास बस रेंजमधुन बाहेर गेल्यानंतरही त्याचा विनाअडथळा लाभ घेता येत आहे. नाशिक-१ या आगाराच्या सर्व बस, मालेगाव, मनमाड, त्र्यंबकेश्वर आगाराच्या बस अशा जवळपास ३५० बस वायफायने सुसज्ज झाल्या असून उर्वरित बसमध्ये लवकरच वायफाय यंत्रणा बसवण्यात येणार आहे, असे महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले.