कालिका यात्रेत मोफत वायफाय

By Admin | Updated: September 27, 2016 01:09 IST2016-09-27T01:08:23+5:302016-09-27T01:09:01+5:30

नियोजन बैठक : कडेकोट पोलीस बंदोबस्ताची तयारी; भाविकांसाठी सोयीसुविधा

Free wifi in Kali Yatra | कालिका यात्रेत मोफत वायफाय

कालिका यात्रेत मोफत वायफाय

नाशिक : येथील श्री कालिका देवी नवरात्रोत्सवात यंदा भाविकांच्या सोयीसाठी मोफत वायफाय उपलब्ध करून देण्यात येणार असून, मुंबई नाका ते त्र्यंबक नाका परिसरात नवरोत्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना या वायफाय सुविधेचा लाभ मिळणार असल्याची माहिती श्री कालिका देवी मंदिर ट्रस्टच्या नवरात्रोत्सव नियोजन बैठकीत देण्यात आली. तसेच काकड आरती पहाटे साडेचार वाजता होते. मात्र तीनपासूनच भाविकांची मंदिर परिसरात गर्दी होते. या गर्दीवर नियंत्रणासाठी यावर्षापासून पहाटे साडेतीन वाजता काकड आरती घेण्याचा निर्णय मंदिर ट्रस्टने घेतला आहे.
नवरात्रोत्सव सुरक्षितरीत्या पार पाडण्यासाठी ५० महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह २५० पोलीस दिवसरात्र कडेकोट बंदोबस्त ठेवणार असून, ५० खासगी सुरक्षारक्षकांसह दोनशे स्वयंसेवकही सुरक्षेची जबाबदारी सांभाळणार आहेत. त्यांना टी शर्ट आणि ओळखचिन्ह देण्यात येणार आहे. या भागाला जोडणाऱ्या सर्व चौकांमध्ये पोलिसांची क्रॉस पेट्रोलिंगही सुरू राहणार असल्याचे मुंबईनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद वाघ यांनी सांगितले. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था व रस्त्यांचे नियोजन येत्या दोन दिवसांत जाहीर होणार असल्याचे ते म्हणाले. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे ५२ कर्मचारीही संपूर्ण नवरात्री व कोजागिरी पौर्णिमेचा संपूर्ण दिवस तैनात राहणार असल्याचे डॉ. सुभाष काळे यांनी सांगितले.
मंदिर परिसरात स्वच्छता राखण्यासाठी ४० महिला कर्मचारी २४ तास काम करणार आहे. मंदिराच्या आवारात २५ ते ३० दुकानांना २४ तास वीजपुरवठ्याची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी ३० के. व्ही. क्षमतेचे जनरेटर उपलब्ध असणार आहे. दरम्यान, मंदिरपरिसरातील बाहेरील रस्त्यावर दुकाने लावण्यासाठी दुकानदारांना आवश्यक त्या परवानग्या महापालिकेनेही तत्काळ द्याव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष केशव पाटील, सचिव सुभाष तळाजिया, मनापा अधिकारी नितीन नेर, अण्णा पाटील, चंदुलाल शाह आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मंदिर परिसरात २४ सीसीटीव्ही
नवरात्रोत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी तसेच गैरवर्तन करणाऱ्या समाजकंटकांवर मंदिराच्या परिसरात एकूण २४ सीसीटीव्ही कॅमेरे नजर ठेवून असणार आहेत. यातील १६ कॅमेरे मंदिर परिसराच्या आतील, तर आठ कॅमेरे बाहेरील भागात बसविण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली. तसेच यंदा ट्रस्टने भाविकांनी आणलेले नारळ देवी चरण वाढविण्याठी दोन यंत्र विकत घेतल्याचे सांगण्यात आले.
 

Web Title: Free wifi in Kali Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.