साध्वींच्या जागेचा मार्ग मोकळा
By Admin | Updated: July 18, 2015 00:20 IST2015-07-18T00:14:39+5:302015-07-18T00:20:49+5:30
साध्वींच्या जागेचा मार्ग मोकळा

साध्वींच्या जागेचा मार्ग मोकळा
नाशिक : गेल्या दहा दिवसांपासून आखाड्यासाठी स्वतंत्र जागा व स्नानासाठी वेळ मागण्यासाठी प्रसिद्धिमाध्यमांमधून चर्चेत राहणाऱ्या साध्वी त्रिकाल भवन्ता यांना अखेर जागा देण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने दर्शविली असून, त्यांना त्र्यंबकला जागा हवी की नाशिकला याचा फैसला करण्याची सूचना करण्यात आली आहे.
शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने साध्वींना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून घेत त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, मेळा अधिकारी महेश पाटील यांनी साध्वी यांनी यापूर्वी दिलेल्या निवेदनाच्या आधारे त्र्यंबकला जागा देण्याची तयारी दर्शविली, परंतु साध्वींनी नाशिकमध्येच जागा हवी असा हट्ट धरला; मात्र त्या जितकी जागा मागत आहेत, तितकी देणे शक्य नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
त्यावर त्र्यंबकला अधिक जागा देणे शक्य होणार असल्याचे सांगून प्रशासनाने साध्वींना प्लॉट क्रमांकही दिले. त्यावर अगोदर जागा पाहूनच निर्णय घेऊ असे साध्वींनी आश्वासन दिले. महिला साध्वींच्या आखाड्यात मोठ्या प्रमाणावर महिला साध्वी येणार असल्याने त्यांच्या सुरक्षिततेची हमी घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली. स्नानासाठी स्वतंत्र वेळेचा विषय हा आखाडा परिषदेअंतर्गत विषय असल्याने आखाडा परिेषदेकडून वेळ घ्यावी अशी सूचना प्रशासनाकडून करण्यात आली.