1.85 लाख रुग्णांवर मोफत औषधोपचार

By Admin | Updated: September 22, 2015 23:34 IST2015-09-22T23:33:36+5:302015-09-22T23:34:26+5:30

पालिकेची वैद्यकीय सेवा : ९७ गंभीर रुग्णांवर उपचार; ३९२ डॉक्टरांनी दिले योगदान; स्वाइन फ्ल्यूसाठीही विशेष कक्ष

Free medication at 1.85 lakh patients | 1.85 लाख रुग्णांवर मोफत औषधोपचार

1.85 लाख रुग्णांवर मोफत औषधोपचार

नाशिक : सिंहस्थ कुंभपर्वकाळात दोन महिन्यांत तीनही शाही पर्वणींसह महापालिकेने पुरविलेल्या वैद्यकीय सेवेचा १ लाख ८५ हजार रुग्णांनी लाभ घेतला तर ९७ गंभीर रुग्णांना तातडीने वैद्यकीय सुविधा पुरवत महापालिकेच्याच इंदिरा गांधी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे महापालिकेने संपूर्ण पर्वकाळात मोफत औषधोपचार केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांनी दिली.
महापालिकेमार्फत १३ जुलै ते १९ सप्टेंबर या कालावधीत कुंभमेळ्यानिमित्त शहरात दाखल झालेल्या भाविकांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली होती. त्यासाठी साधुग्राममध्ये १०० खाटांचे स्वतंत्र रुग्णालय कार्यान्वित करण्यात आले होते. तर महापालिकेचे इंदिरा गांधी रुग्णालय, कथडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय याठिकाणी उपचाराची व्यवस्था करण्यात आली होती. या व्यतिरिक्त २६ ठिकाणी तात्पुरते दवाखाने, पाच ठिकाणी विविध इमारतींमध्ये तात्पुरत्या स्वरूपातील दवाखाने आणि ६ ठिकाणी मोबाईल डिस्पेन्सरीही कार्यरत ठेवण्यात आल्या होत्या. संपूर्ण पर्वकाळात महापालिकेने पुरविलेल्या वैद्यकीय सेवेचा १ लाख ८५ हजार ४७१ रुग्णांनी लाभ घेतला. याशिवाय १२५३ जणांना आंतर रुग्णसेवा पुरविण्यात आली तर ९७ गंभीर रुग्ण इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील २० अतिगंभीर रुग्णांना जीवनदान देण्यात वैद्यकीय विभागाला यश आले. इंदिरा गांधी रुग्णालयात स्वाइन फ्लूसाठीही १६ बेडचा विशेष कक्ष तयार करण्यात आला होता. ही सर्व वैद्यकीय सेवा पुरवण्यात ३९२ शासकीय व खासगी तज्ज्ञ डॉक्टर्स, ३२६ परिचारिका व १९३ फार्मासिस्ट यांचा सहभाग होता. रुग्णांना तत्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेमार्फत ११८ रुग्णवाहिका महत्त्वाच्या ठिकाणी तैनात ठेवण्यात आल्या होत्या. १०८ नंबरच्या रुग्णवाहिकांमार्फत ९१२ रुग्णांना तत्काळ संदर्भ रुग्णालयात दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. महापालिकेने रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी व्हेन्टिलेटर, मॉनिटर, डॉपलर, एक्स-रे मशीन यासाठी अत्याधुनिक उपकरणे खरेदी केली होती. विशेष म्हणजे या रुग्णांवर मोफत उपचार केले.

Web Title: Free medication at 1.85 lakh patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.