ठाणगाव : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील ठाणगाव शिवारात आठ दिवसांपासून दोन बछड्यांसह बिबट्या मादीचा मुक्त संचार असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली असून, शेतकरी कामावर जाण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. परिसरात पिंजरा बसविण्याची मागणी होत आहे.ठाणगावच्या पश्चिमेस मारुतीचा मोढा म्हणून परिसर आहे. या भागात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या जंगलात नेहमीच बिबट्यांचे वास्तव्य असते. जंगलात पाणी मिळत नसल्याने हिंस्त्रप्राणी पाण्याच्या शोधात मारुतीचा मोढा परिसरातील मानवी वस्त्यांमध्ये येत असतात. आठ दिवसांपासून मादी बिबट्यासह दोन बछडे दिवसाढवळ्या शिंदे वस्त्यांवरील पाणवठ्याच्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी येत असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी पाहिले आहे. यामुळे परिसरात दशहत पसरली आहे. महिला व मजूर शेतात कामाला जाण्यास धास्तावले असून, कामावर जाण्यास नकार देत आहेत. या मादी बिबट्याने अद्याप कोणताही त्रास दिला नसला तरी त्यांच्या मुक्त संचारामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. बिबट्या मादीचा व बछड्यांचा बंदोबस्त करण्यासाठी परिसरात पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
बिबट्या मादीचा दोन बछड्यांसह मुक्त संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2016 00:01 IST