कुलगुरूंच्या वाहनासाठी स्वतंत्र एन्ट्री
By Admin | Updated: January 11, 2017 00:26 IST2017-01-11T00:26:10+5:302017-01-11T00:26:25+5:30
नूतनीकरणाची कामे : अधिकाऱ्यांचीच दिशाभूल; कॅन्टीनलाही दाखविला ठेंगा

कुलगुरूंच्या वाहनासाठी स्वतंत्र एन्ट्री
संदीप भालेराव : नाशिक
अकरा महिन्यांपूर्वी विद्यापीठात दाखल झालेल्या कुलगुरूंनी नवीकोरी गाडी खरेदी केल्यानंतर आता कुलगुरूंच्या गाडीसाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्याचे काम विद्यापीठात सध्या सुरू आहे. यासाठी या मार्गावरील कॅन्टीन बंद करून विद्यापीठाच्या मागील बाजूस कॅन्टीन स्थलांतरित करण्यात आली आहे. नवा गडी नवा राज याप्रमाणे शासकीय अधिकारी बदलीच्या ठिकाणी अनेक बदल करीत असतात. त्यास कुलगुरू म्हैसेकर हेदेखील अपवाद ठरलेले नाही. शासकीय शिस्तीला प्राधान्य देणारे आणि वाणीपेक्षा कागदाला महत्त्व देणारे अधिकारी म्हणून त्यांची अल्पावधीतच विद्यापीठात ओळख झाली. त्यामुळे बोलण्यापेक्षा काहीतरी करून दाखविणाऱ्या कुलगुरूंनी फारशी चर्चा होऊ न देता नवी गाडी मिळवून त्यासाठी व्यवस्थापन परिषदेकडून जादा खर्चाची तरतूदही करवून घेतली. त्यासोबत अन्य तीन गाड्यादेखील मंजूर करण्यात आलेल्या आहेत. तत्कालीन कुलगुरुंच्या वाहनांवरील खर्चाचाबाबत आक्षेप घेण्यात आला होता. तसा आक्षेप मात्र विद्यमान कुलगुरुंबाबत कोणीही घेतला नाही. शासकीय दरबारी वजन असल्यामुळे कुलगुरूंबाबत विद्यापीठात कोणताही विरोधाचा सूर निघाला नसल्याचे समजते. त्यातच प्रभारी कुलसचिव हेदेखील कुलगुरूंच्या जवळचे मानले जात असल्याने कुलगुरूंच्या वाहनासाठी स्वतंत्र मार्गाला कोणताही अडसर आला नाही. याउलट सर्वांसाठी सोयिस्कर अशी कॅन्टीन येथून हटविण्यात आली आहे. कॅन्टीनमध्ये कर्मचारी जास्त वेळ जाऊन बसतात म्हणून कॅन्टीन हटविण्यात आल्याचे कारण पुढे करण्यात आले होते. नंतर मात्र कुलगुरूंच्या वाहनासाठी स्वतंत्र मार्गात कॅन्टीनचा काही भाग येणार असल्याने यात थोडेफार बदल केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. विद्यापीठाच्या मागील बाजूस असलेल्या या मार्गावर सध्या पेव्हर ब्लॉक टाकण्याचे काम पूर्णत्वास येत आहे. कुलगुरू या नव्या मार्गाने विद्यापीठात येतील आणि जुन्या मार्गाने बाहेर पडतील, अशी नवी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. असे करण्यामागे कोणतेही विशेष असे कारण नाही, मात्र शासकीय इमारतीमध्ये अशा प्रकारची व्यवस्था असते तीच व्यवस्था येथेही असावी, असा या मागचा अट्टहास असल्याचे खासगीत बोलले जात आहे.