मातीची गणेशमूर्ती बनवून गावात मोफत वाटप
By Admin | Updated: September 5, 2016 00:35 IST2016-09-05T00:33:22+5:302016-09-05T00:35:07+5:30
मातीची गणेशमूर्ती बनवून गावात मोफत वाटप

मातीची गणेशमूर्ती बनवून गावात मोफत वाटप
येवला : पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने सायगाव येथील तरुणाने मातीच्या गणेशमूर्ती बनवून गावात मोफत वाटप करून पर्यावरण जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
पर्यावरणप्रेमींनी राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही संकल्पना राबविण्यास सुरु वात केली आहे. या संकल्पनेला व्यापक प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे इकोफ्रेंडली गणपतींची मागणीदेखील वाढली आहे.
प्लॅस्टर आॅफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेशमूर्ती आणि त्यांच्या सजावटीसाठी वापरलेल्या रासायनिक रंगांमुळे जलप्रदूषणाचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे या ध्येयवेड्या पोपट वालतुरे या तरुणाने पर्यावरणाला पूरक ठरणाऱ्या साध्या मातीच्या गणेशमूर्ती बनवून गावात वाटपाचे काम सुरू केले आहे.
काही सामाजिक संघटनाही पर्यावरणपूरक गणेशमूर्तीसाठी पुढे आल्या आहेत तरीही या युवकाचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक मातीच्या गणपतींची स्थापना करण्याचा पायंडा ग्रामीण भागात यानिमित्ताने सुरू होत आहे. मातीपासून तयार केलेल्या या मूर्तीच्या रंगकामासाठी नैसर्गिक रंग वापरणार असल्याचे वालतुरे यांनी सांगितले. मातीच्या गणेशमूर्तीचे विसर्जन बादलीतील पाण्यात करू शकतो जेणेकरून मूर्तीचे विघटन होऊन ते पाणी झाडांना देता येईल. (वार्ताहर)