वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत ‘मुक्त’ ठाम
By Admin | Updated: January 20, 2016 23:50 IST2016-01-20T23:49:46+5:302016-01-20T23:50:18+5:30
कुलगुरूंची भुमिका : आरोग्य विद्यापीठाचा आक्षेप धुडकावला

वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत ‘मुक्त’ ठाम
नाशिक : सुमारे चार महिन्यांपूर्वी यशवंतराव महाराष्ट्र चव्हाण मुक्त विद्यापीठाने विज्ञान शाखेंतर्गत बीएएमएसनंतरचे पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचे जाहीर केल्यानंतर त्यास आरोग्य विज्ञान विद्यापीठाने आक्षेप घेतल्याने अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरू न करण्याची भूमिका विद्यापीठाने घेतली होती; मात्र आता कुलगुरू मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू माणिकराव साळुंखे यांनी आरोग्य विद्यापीठाचा आक्षेप धुडकावून लावत आरोग्य विद्यापीठाला असा कोणताच अधिकार नसल्याने वैद्यकीय शाखेचे अभ्यासक्रम सुरू केले जातील अशी भूमिका घेतली आहे.
मुक्त विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने विविध प्रकारचे १८ नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये आरोग्य विज्ञान विद्याशाखेच्या अंतर्गत डिप्लोमा इन स्पोर्ट मेडिसिन, सर्टिफिकेट डिप्लोमा इन डायलिसिस क्लिनिकल असिस्टंट, तर पुण्याच्या भारत विकास शिक्षण संस्थेच्या सहकार्याने बीएमएमसनंतर पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत जाहीर केले होते. त्याचप्रमाणे कायचिकित्सा (जनरल मेडिसिन, आयुर्वेद), स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र (गायनाकॉलॉजी आणि आॅबस्ट्रेट्रिक्स) कौमारभृत्य (चाइल्ड हेल्थ-आयुर्वेद) हे शिक्षणक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
परंतु आरोग्य विज्ञान विद्यापीठाने त्यास तीव्र आक्षेप घेत आरोग्य अभ्यासक्रम राबविण्याची जबाबदारी ही आरोग्य विद्यापीठाची असून त्या हेतूनेच विद्यापीठाची स्थापन करण्यात आल्याचे मुक्त विद्यापीठाला लेखी स्वरूपात कळविले होते. तसेच ज्या संस्थेच्या माध्यमातून मुक्त विद्यापीठाने आरोग्यविषयक अभ्यासक्रम सुरू करण्याचे योजिले होते, त्या भारत विकास शिक्षण संस्थेशीदेखील विद्यापीठाने पत्रव्यवहार केला होता. याच संस्थेच्या माध्यमातून आरोग्य विज्ञान विद्यापीठात अभ्यासक्रम सुरू असताना मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणे चुकीचे असल्याची भूमिका आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतली होती.
परंतु आता मुक्तचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मुक्त विद्यापीठाला अडविण्याचा अधिकार आरोग्य विद्यापीठाला नसल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे आता आरोग्य विद्यापीठ काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)