विवाहित पुरुषाशी लग्न लावून महिलेची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 12:08 AM2020-02-10T00:08:55+5:302020-02-10T00:54:38+5:30

मालेगाव मध्य : विवाहित पुरुषाशी महिलेचा विवाह लावून तिला मारहाण व दमदाटी करीत तलाकच्या कागदपत्रांवर बळजबरीने सह्या घेत परस्पर ...

Fraud of a woman by marrying a married man | विवाहित पुरुषाशी लग्न लावून महिलेची फसवणूक

विवाहित पुरुषाशी लग्न लावून महिलेची फसवणूक

Next
ठळक मुद्देपरभणीच्या पीडितेची तक्रार : रमजानपुरा पोलिसात दोन जणांविरोधात गुन्हा

मालेगाव मध्य : विवाहित पुरुषाशी महिलेचा विवाह लावून तिला मारहाण व दमदाटी करीत तलाकच्या कागदपत्रांवर बळजबरीने सह्या घेत परस्पर पीडित महिलेचा पुन्हा दुसरा निकाह लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली. सदर इसमासह त्याला मदत करणाऱ्या महिलेविरोधात रमजानपुरा पोलिसात पीडित महिलेने तक्रार दिली. शनिवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निकाह लावून महिला व परराज्यातील पुरुषांची फसवणूक करणारी टोळी शहरात कार्यरत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून रॅकेटचा पर्दाफाश करावा, अशी मागणी नश्र फाउण्डेशनतर्फे उर्दू मीडिया सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली.
फिर्यादीत म्हटले आहे की, परभणीतील एका मुलीचा निकाह ३१ जानेवारीस संशयित शेख इमरान शेख आबीद रा. सलमान फारसी मशीदजवळ, रमजानपुरा याच्याशी झाला. परभणीतून मनमाडला पोहोचताच संशयित इमरानने पीडित महिलेस मध्यस्थ असलेल्या शबाना नुरअली शाह रा. सलीमनगर हिच्याकडे सोडून निघून गेला. संशयित महिला शबानाने पीडितेस तिच्या घरी आणले. इमरानचे लग्न झाले असून, त्यास दोन अपत्ये आहेत. दोन दिवसानंतर इमरान आला. शबाना व इमरान याने पीडितेस रिक्षाने एका कार्यालयात नेले. तेथे तलाकच्या कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी भाग पाडले. त्यानंतर पुन्हा घरी न आणता म्हाळदे शिवारात नेले. तिच्या गळ्यातील १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे पान, पाच हजारांचे पायातील चांदीचे पैंजण काढून घेत तिला दोन दिवस कोंडून ठेवले. नंतर इमरान व शबाना यांनी पीडितेचे दुसरे लग्न लावण्यासाठी बळजबरीने हळद-मेहंदी लावली. शुक्रवारी पीडित महिलेचे वडील आले असता सदर प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.
पीडितेच्या वडिलांनी नश्र फाउण्डेशनच्या पदाधिकाऱ्यांसमोर झालेला प्रकार कथन केला. पीडित महिलेसह त्यांनी रमजानपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. शेख इमरान शेख आबीद व मध्यस्थी महिला शबाना नुरअली शाह या दोघांविरोधात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात करीत आहेत.

शहरात असे प्रकार अनेकदा घडले आहेत. समाजाची बदनामी होऊ नये म्हणून आपसात बसून अर्थपूर्ण समेट घडवून प्रकरणे परस्पर मिटविली जातात. याबाबत पोलिसांत तक्रारही देण्यात येत नाही. त्यामुळे मध्यस्थांचे फावून अनेक गोरगरीब कुटुंबांची फसवणूक केली जात आहे.
- डॉ. इब्राहीम सय्यद, पदाधिकारी, नश्र फाउण्डेशन

सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात यश न आल्याने आम्हास आर्थिक आमिष दाखविण्यात आले. माझे आई-वडील गरीब असून, मोलमजुरी करतात. भविष्यात कुठल्याही तरुणीवर असा प्रसंग ओढवू नये म्हणून संशयितांवर कठोर कारवाई करून आम्हास न्याय देण्यात यावा.
- पीडित महिला

Web Title: Fraud of a woman by marrying a married man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.