दहा कोटी रुपयांची फसवणूक
By Admin | Updated: April 3, 2015 01:41 IST2015-04-03T01:41:02+5:302015-04-03T01:41:27+5:30
दहा कोटी रुपयांची फसवणूक

दहा कोटी रुपयांची फसवणूक
पंचवटी : रयत सेवक को-आॅप. बॅँक सातारा शाखेच्या आडगाव नाका येथील शाखेत बॅँकेचे शाखा अधिकारी, लेखापाल, वरिष्ठ लिपिक व अन्य एक अशा चौघांनी बनावट दस्ताऐवज तयार करून रयत बॅँकेची सुमारे दहा कोटी रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न उघडकीस आला. याप्रकरणी रयत सेवक बॅँकेचे शाखा अधिकारी, लेखापाल, वरिष्ठ लिपिकासह चौघांवर फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आडगाव पोलिसात दाखल करण्यात आला. या फसवणुकीबाबत बॅँकेचे सरव्यवस्थापक भारत मधुकर कदम (रा. सांगली) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार ३ ते २० मार्च या कालावधीत बॅँकेच्या आडगाव नाका शाखेत हा प्रकार घडला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रयत सेवा बॅँकेत शाखा अधिकारी नंदकुमार हनुमंत टेंभे, लेखनिक सुनील पवार, वरिष्ठ लिपिक पुंजाराम कोतवाल, तसेच प्रसन्नजीत बक्षी या चौघांनी देना एज्युकेश ट्रस्ट या नावाने पाच कोटी रुपये रक्कम टाकलेले दोन धनादेश तयार करून ते आयडीबीआय बॅकेत जमा केले. सदर धनादेश वटविण्यासाठी शाखा अधिकाऱ्याने स्टॅम्प पेमेंट तयार करून इतरांना मदत केली. मात्र, रयत बॅँकेस सदर बाब वेळीच लक्षात आल्याने कोट्यवधींची फसवणूक टळली. दरम्यान, या प्रकरणातील संशयितांनी वाशी, तसेच कोपरगाव शाखेत बदली करण्यात आली आहे. (वार्ताहर)