आमिष दाखवून साडेआठ लाखांची फसवणूक
By Admin | Updated: May 13, 2017 01:23 IST2017-05-13T01:23:52+5:302017-05-13T01:23:52+5:30
नाशिक : स्वस्तात वस्तू देण्याचे आमिष दाखवून वृद्धास साडेआठ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला

आमिष दाखवून साडेआठ लाखांची फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सोशल मीडियावरील फेसबुकवरून ओळख व चॅटिंग याद्वारे विश्वास संपादन करून स्वस्तात वस्तू देण्याचे आमिष दाखवून एका वृद्धास साडेआठ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात आयटी अॅक्टन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कालिका दर्शन सोसायटीत अरुणकुमार जगन्नाथ पाटील (६३) हे राहतात़ पाटील यांची फेसबुकद्वारे हॅप्पीनेस डेव्हिड एक्स्प्रेस इलाइट सर्व्हिस या कंपनीच्या एजंटशी संपर्क झाला. या कंपनीच्या एजंटनी चॅटिंग करून विश्वास संपादन केला व महागड्या वस्तू स्वस्तात देण्याचे आमिष दाखविले़ या संशयितांनी २४ फेब्रुवारी ते १८ एप्रिल २०१७ या कालावधीत कंपनीचे एजंट, अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या विविध बँक खात्यांमध्ये आठ लाख ३२ हजार रुपये पाटील यांनी जमा केले़ मात्र, पैसे जमा करूनही वस्तू मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे पाटील यांच्या लक्षात आल्याने त्यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़