दिंडोरी : दिंडोरीसह तालुक्यातील अनेक भागात द्राक्ष काढणीचा हंगाम वेगाने सुरू असून, व्यापाऱ्याकडून द्राक्ष बागायतदारांना लाखो रुपयांना गंडा घालून परप्रांतीय व्यापाऱ्यांनी पोबारा केल्याने द्राक्ष बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. येथील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये व्यापाऱ्यांनी द्राक्ष बागायतदारांना दिलेले लाखो रुपयांचे धनादेश त्यांच्या खात्यात शिल्लक नसल्याने रक्कम शिल्लक नसल्याचा शेरा लावून तेथेच पडले आहे.व्यापाऱ्यांचा निश्चित ठावठिकाणा सापडत नसल्यामुळे त्यांनी दिलेला पत्ता हा खोटा असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार व्यापाऱ्यांवर खोटा धनादेश दिल्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी अडचण येत आहे. मडकीजांब, लोखंडेवाडी, जोपूळ, पाडे आदि भागात व्यापाऱ्यांनी मोठा उछाद मांडला आहे.द्राक्ष बागायतदारांवर निराशाजनक परिस्थिती ओढविली असल्याने पाडे परिसरातील शेतकऱ्याचे द्राक्षमाल व्यापाऱ्याने खरेदी केले; पण पैसे न देता त्याने पोबारा केला आहे तसेच निळवंडी, पाडे व लखमापूर येथे ही द्राक्षमाल घेऊन व्यापारी फरार झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दुष्काळी परिस्थितीचा विचार करता मोठ्या जिकिरीने यंदा द्राक्षपीक घेता आले असता व्यापाऱ्यांचा पोबारा वाढला आहे. (वार्ताहर)
द्राक्ष बागायतदारांची फसवणूक
By admin | Updated: March 23, 2016 22:34 IST