बनावट कागदपत्रांवरून व्यावसायिकाची फसवणूक
By Admin | Updated: October 7, 2015 00:01 IST2015-10-07T00:01:32+5:302015-10-07T00:01:55+5:30
सात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

बनावट कागदपत्रांवरून व्यावसायिकाची फसवणूक
नाशिक : नाशिक येथील प्रख्यात बांधकाम व्यावसायिक अशोक कटारिया यांच्या नावाने अटक पूर्व जामीन मिळविण्यासाठी त्यांच्या सहमतीचे बनावट कागदपत्रे उच्च न्यायालयात सादर करत कटारिया व न्यायालय यांची फसवणूक केल्याची घटना मंगळवारी (दि.६) उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कटारिया यांनी दिलेल्या फिर्यादिवरून संशयित राजेंद्र अरविंद प्रताप, ओनिल रमेश प्रताप, वासुदेव एकनाथ भगत, नीलेश पंढरीनाथ पाटील, सुदाम मनोहर परब, संजय वामनराव बोडके, विलास पुरुषोत्तम काठे, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापैकी पाटील या संशयिताने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यासाठी अटकपूर्व जामीन मिळविण्याकरिता मुंबई उच्च न्यायालयाकडे बनावट दस्ताऐवज कटारिया यांच्या नावाने तयार करून ते खरे असल्याचे भासवून अर्ज केला होता. सदर बाब कटारिया यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन वरील सर्व संशयितांविरोधात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कोळी करीत आहेत. (प्रतिनिधी)