जलयुक्तच्या कामात ठेकेदाराकडून फसवणूक
By Admin | Updated: July 7, 2016 00:36 IST2016-07-06T23:26:33+5:302016-07-07T00:36:30+5:30
कृषी खात्याचे कानावर हात : मालक उपोषणाच्या तयारीत

जलयुक्तच्या कामात ठेकेदाराकडून फसवणूक
नाशिक : जलयुक्त शिवार अभियानात पाणी अडवून जिरविण्यावर भर देण्याऐवजी या अभियानाची मुख्य जबाबदारी असलेल्या कृषी खात्याने ठेकेदाराला हाताशी धरून या योजनेतही भ्रष्टाचार करून पैसे अडवा, पैसे जिरवा हा कित्ता कायम ठेवला असल्याचे उघडकीस आले आहे. जमीन सपाटीकरणाचे काम ठेकेदाराला दिलेल्या कृषी खात्याने सपाटीकरणाचे काम करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांच्या तोंडाला पाने पुसून ठेकेदाराचे चांगभलं केल्याने ट्रॅक्टर मालक उपोषणाच्या तयारीत आले आहेत.
सुरगाणा तालुक्यातील आमदा बाऱ्हे व कहांडोळसा या गावांमध्ये हा प्रकार घडला असून, यासंदर्भात ट्रॅक्टर मालकांनी आवाज उठविल्यानंतर ठेकेदार व कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करण्यास सुरुवात केली आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत या दोन्ही गावांमध्ये जमीन सपाटीकरणाचे काम कृषी खात्याने किरण अहिरे या ठेकेदाराला दिले. ठेकेदाराने तालुक्यातीलच काही ट्रॅक्टर मालकांकडून काम करून घेताना जितके काम होईल त्या प्रमाणात पैसे देण्याचे कबूल केले होती. साधारणत: एप्रिल महिन्यात पंधरा दिवसांत हे काम पूर्ण झाल्यावर या कामाचे मोजमाप कृषी सहायक संतोष फापाळे यांनी केले व त्यानुसार शासनाने या कामाचे ३ लाख ८१ हजार रुपये मंजूरही केले. मात्र त्यानंतर ठेकेदाराने ट्रॅक्टर चालकांना फक्त १६६ रुपये रोज याप्रमाणे पैसे देण्याचा प्रयत्न केला व उर्वरित रक्कम खिशात घातल्याची तक्रार या ट्रॅक्टर मालकांनी केली आहे.
ठेकेदार अहिरे याने या साऱ्या प्रकाराबाबत कृषी सहायक फापाळे यांच्याकडे अंगुलीनिर्देश करताना शंभर टक्के काम पूर्ण झालेले असताना त्यांनी ५० टक्केच काम झाल्याचे नमूद केल्यामुळे हा प्रकार घडल्याचे म्हटले आहे, तर फापाळे यांनी शंभर टक्के काम पूर्ण होऊन पैसेही मंजूर झाल्याचे सांगितले आहे. सलग पंधरा दिवस काम करूनही हातात जेमतेम रक्कम पडत असल्याचे पाहून ट्रॅक्टर मालकांनी तालुका कृषी अधिकारी डंबाळे यांची भेट घेतली असता, त्यांनी यात आपला काहीच संबंध नसल्याचे सांगून कानावर हात ठेवले आहेत. (प्रतिनिधी)