"त्या" स्फोटात भाजलेला चौथा युवक मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:14 AM2021-04-11T04:14:25+5:302021-04-11T04:14:25+5:30

------ नाशिक : वडाळानाका भागातील संजरी नगर इमारतीत आठवडाभरापूर्वी रात्रीच्या सुमारास अचानक घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. या ...

A fourth youth was burnt to death in the blast | "त्या" स्फोटात भाजलेला चौथा युवक मृत्युमुखी

"त्या" स्फोटात भाजलेला चौथा युवक मृत्युमुखी

Next

------

नाशिक : वडाळानाका भागातील संजरी नगर इमारतीत आठवडाभरापूर्वी रात्रीच्या सुमारास अचानक घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. या दुर्घटनेत घरातील सात लोक जखमी झाले होते. जखमींपैकी शुक्रवारी मध्यरात्री चौथ्या युवकाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृतांचा आकडा आता सहावर पोहोचला आहे. रमजान वलीउल्ला अन्सारी(२२) असे उपचारादरम्यान मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.

गेल्या शुक्रवारी रात्री घरगुती गॅस सिलिंडर बदलताना गळती होऊन स्फोट झाल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत सय्यद कुटुंबातील चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यामध्ये दोन महिला व दोघा सख्ख्या भावांचा समावेश आहे, तसेच अन्सारी कुटुंबातील शोएब वलीउल्ला अन्सारी (२८) याचाही मृत्यू झाला. त्यापाठोपाठ त्याचा सख्खा भाऊ रमजानचीही प्राणज्योत खासगी रुग्णालयात मालवली. या दोन्ही कुटुंबीयांवर आभाळ फाटले आहे. घरातील कर्ते तरुण मुले नियतीने कायमची हिरावून नेली आहेत. नाशिक शहरात अशाप्रकारे दुर्घटनेत सहा बळी जाण्याची ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत नसरीन नुसरद सय्यद (२५) आणि सईदा शरफोद्दीन सय्यद ( ४९) या नणंद-भावजयी पहिल्यांदा रुग्णालयात उपचार घेताना मृत्युमुखी पडल्या होत्या.

-----इन्फो-----

पीडित कुटुंबीयांना शासकीय मदतीची प्रतीक्षा

स्फोटाच्या दुर्घटनेमुळे सय्यद, अन्सारी या कुटुंबांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या दोन्ही कुटुंबांनी या दुर्घटनेत आपल्या दोघा तरुण मुलांना कायमचे गमावले आहे, तसेच सय्यद कुटुंबातील मुलगी व सुनेचाही मृत्यू झाला आहे. हे दोन्ही कुटुंब पूर्णतः उद्‌ध्वस्त झाले असून, त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी मागणी सर्व स्तरातून जोर धरु लागली आहे.

--------

इन्फो

----

मुस्लीम समाजाने उभारला दीड लाखांचा मदतनिधी

पीडित दोघा कुटुंबांच्या मदतीसाठी मुस्लीम समाजाने हात पुढे केला आहे. शहर-ए-खतीब हिसमुद्दीन अशरफी यांच्या परवानगीनंतर शहरातील विविध भागांतील मशिदींमधून प्रमुख धर्मगुरूंनी केलेल्या आवाहनाला समाजबांधवांनी प्रतिसाद देत चंदा सढळ हाताने दिला. त्यामुळे आतापर्यंत जवळपास दीड लाखांचा निधी उभारण्यास यश आले आहे.

Web Title: A fourth youth was burnt to death in the blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.