आठवडाभरात चौथ्यांदा बाधित संख्या दोनशेपल्याड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 00:32 IST2021-02-18T00:31:47+5:302021-02-18T00:32:51+5:30
नाशिक : फेब्रुवारी महिन्याच्या ११ तारखेपासूनच्या आठवडाभरात चौथ्यांदा कोरोनाबाधित संख्येने दोनशेचा आकडा ओलांडला आहे. बुधवारी (दि. १५) कोरोना बाधितांच्या संख्येत २०९ ने वाढ झाली असून २२१ रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

आठवडाभरात चौथ्यांदा बाधित संख्या दोनशेपल्याड
नाशिक : फेब्रुवारी महिन्याच्या ११ तारखेपासूनच्या आठवडाभरात चौथ्यांदा कोरोनाबाधित संख्येने दोनशेचा आकडा ओलांडला आहे. बुधवारी (दि. १५) कोरोना बाधितांच्या संख्येत २०९ ने वाढ झाली असून २२१ रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ११ फेब्रुवारीला २०६ तर १२ फेब्रुवारीला २९६ पर्यंत पोहोचली होती. तर १५ फेब्रुवारीलादेखील बाधितांचा आकडा २०४ होता. त्यामुळे या आठवड्यात काही प्रमाणात तरी कोरोना वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने जनजागृतीचे काम सुरूच असले तरी अनेक नागरिकांना मार्गदर्शक तत्त्वांचा विसर पडल्यासारखेच त्यांचे वर्तन आहे.
दरम्यान, बुधवारी नाशिक शहरला २ आणि ग्रामीणला एक याप्रमाणे तिघांचे निधन झाल्याने एकूण मृतांची संख्या २०७७ वर पोहोचली आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख १८ हजार ७२२ वर पोहोचली असून, त्यातील एक लाख १५ हजार ४६३ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर १,१८२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९७.२५ वर पोहोचली आहे.
त्यात नाशिक शहरात ९७.९१, नाशिक ग्रामीण ९६.४७, मालेगाव शहरात ९३.०३, तर जिल्हाबाह्य ९४.२१ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या पाच लाख २२ हजार ४६६ असून, त्यातील चार लाख २ हजार ५४४ रुग्ण निगेटिव्ह, तर एक लाख १८ हजार ७२२ रुग्ण बाधित आढळून आले असून, १२०० रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.