चौथ्या दरोडेखोराला मुंबईतून अटक
By Admin | Updated: July 30, 2014 00:17 IST2014-07-29T23:58:25+5:302014-07-30T00:17:47+5:30
सराफी पेढी दरोडा प्रकरण : चार रिव्हॉल्वरसह २१ जिवंत काडतुसे हस्तगत

चौथ्या दरोडेखोराला मुंबईतून अटक
नाशिकरोड : दत्तमंदिररोड येथील शहाणे सराफ या सराफ पेढीवर दरोडा टाकून व दुकान मालकावर गोळीबार करून फरार झालेल्या दरोडेखोरातील चौथ्या दरोडेखोराला नाशिक क्राईम ब्रॅँच युनिट ३ च्या पथकाने मुंबईतील गोरेगाव येथे जाऊन शिताफीने पकडले. त्यांच्याकडून चार रिव्हॉल्वर व २१ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. आहेत.
दत्तमंदिररोड येथील शहाणे सराफ या पेढीवर रविवारी भरदुपारी सव्वातीनच्या सुमारास चार-पाच सशस्त्र दरोडेखोरांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकानमालक व त्यांच्या मावस भावाच्या कडव्या प्रतिकारामुळे त्यांचा लुटीचा प्रयत्न असफल झाला होता. मात्र यावेळी दरोडेखोरांनी सहीसलामत पळून जाण्यासाठी अभय शहाणे यांच्या पोटात एक गोळी झाडून जखमी करून पलायन केले होते. मात्र नाशिक पोलिसांनी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने दरोड्याच्या घटनेनंतर अवघ्या अडीच तासांत पडघा येथे शेषनाथ सुदामा उपाध्ये, मुरली जिन्नप्पा पुजारी, हैदरअली गबू शेख यांना अटक केली होती, तर त्यांचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले होते.
नाशिक क्राईम ब्रँचची कामगिरी
नाशिक क्राईम ब्रॅँच युनिट तीनचे पोलीस निरीक्षक संजय सानप, हवालदार सुभाष गुंजाळ, सुभाष सातपुते, अनिल उबाळे, विलास गांगुर्डे, गंगाधर केदारे, राजू जाधव यांचे पथक मिळालेल्या गुप्त माहितीनुसार लागलीच मुंबईला रवाना झाले होते. क्राईम ब्रॅँचच्या पथकाने दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी मेहताब आलम ललईखान (३८) व्यवसाय मच्छी विक्रेता रा. शिवशाही, म्हाडा कॉलनी, गोरेगाव, पूर्व मुंबई, मूळ रा. उत्तर प्रदेश याला आज त्याच्या राहत्या घराजवळ सापळा रचून शिताफीने पकडले. त्यांच्याकडून चार रिव्हॉल्वर व २१ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
दरोडेखोर मेहताब आलम ललईखान हा कुप्रसिद्ध दरोडेखोर असून, त्याची व त्याच्या सहकाऱ्याची दरोडे व जबरी चोरी करणारी मोठी गॅँग आहे, तर फरार पाचव्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)