नासाका अध्यक्षांसह चौघांचा राजीनामा
By Admin | Updated: April 2, 2015 00:25 IST2015-04-02T00:16:03+5:302015-04-02T00:25:52+5:30
कार्यस्थळावर चर्चा : जिल्हा बॅँक निवडणुकीसाठी सोडले पद

नासाका अध्यक्षांसह चौघांचा राजीनामा
नाशिकरोड :नाशिक साखर कारखान्याचे अध्यक्ष देवीदास पिंगळेंसह चौघा जणांनी कारखान्याच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हा बॅँकेची आगामी काळात होणारी निवडणूक लक्षात ठेवून राजीनामा दिला असल्याची कारखाना सभासदांमध्ये जोरदार चर्चा आहे.
नाशिक साखर कारखाना गेल्या २०१३-१४ च्या गळीत हंगामापासून बंद पडलेला आहे. कारखाना पुन्हा पूर्ववत सुरू करण्यासाठी कुठल्याही स्तरांवर कोणीही ‘प्रामाणिक’ प्रयत्न न केल्याने दुसऱ्या २०१४-१५च्या गळीत हंगामात देखील कारखाना बंद आहे.
यामुळे गेल्या काही महिन्यांपासून कामगारांचे पगार देखील झालेले नाही. विशेष म्हणजे कारखान्याचे वीज बिल थकल्याने गेल्या काही महिन्यांपासून महावितरणने कारखान्याचा वीज पुरवठा खंडित केला आहे. दोन हंगामापासून कारखाना सुरू झाल्याने व सध्या वीजपुरवठा खंडित असल्याने तुर्तास तरी कारखान्याचे भवितव्य अंधारात आहे.
नाशिक साखर कारखान्याचे अध्यक्ष देविदास पिंगळे, संचालक तुकाराम सखाराम दिघोळे, संतु रामचंद्र पाटील, केरू नामदेव धात्रक, डॉ. सुनील उत्तमराव ढिकले यांनी आपल्या संचालक पदाचा दिलेला राजीमाना गेल्या १९ मार्चच्या संचालकांच्या बैठकीत मंजुर करण्यात आला. त्यानंतर कार्यकारी संचालक डी. वाय. मोठे यांनी अध्यक्ष पिंगळे व इतर चौघांचे संचालकपदाचे राजीनामे साखर कारखान्याचे प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. तुकाराम दिघोळे, संतु पाटील व केरू धात्रक यांनी काही महिन्यांपूर्वीच आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिलेला होता. मात्र तो कारखाना प्रशासनाकडे होता. पिंगळे व ढिकले यांनी आता राजीनामा दिल्याने पुर्वीचे दिघोळे, पाटील, धात्रक यांचे राजीनामे मंजुरीसाठी साखर कारखाना प्रादेशिक सहसंचालकाकडे पाठविण्यात आले आहे.
अध्यक्ष पिंगळे यांनी राजीनामा दिल्याने कारखान्याच्या (बंद कारखाना) अध्यक्ष पदाचा पदभार उपाध्यक्ष जगन आगळे यांच्याकडे संचालकांच्या बैठकीत सर्वानुमते सोपविण्यात आला. जिल्हा बॅँक निवडणुकीचे वारे वाहु लागल्याने राजीनामे दिल्याची सभासदांमध्ये जोरदार चर्चा आहे. (प्रतिनिधी)