चारशे वर्षे जुना नाशिकचा ‘शहाजहांनी ईदगाह’
By Admin | Updated: September 12, 2016 19:08 IST2016-09-12T19:08:34+5:302016-09-12T19:08:34+5:30
नवशिखांवर वसलेलं नाशिक शहर पुर्वी गुलशनाबाद म्हणून ओळखले जात होते. ऐतिहासिक, पौराणिक वारसा या शहराने आजही जपलेला आहे.

चारशे वर्षे जुना नाशिकचा ‘शहाजहांनी ईदगाह’
अझहर शेख, आॅनलाईन लोकमत
नाशिक, दि. १२ - नवशिखांवर वसलेलं नाशिक शहर पुर्वी गुलशनाबाद म्हणून ओळखले जात होते. ऐतिहासिक, पौराणिक वारसा या शहराने आजही जपलेला आहे. गोदाघाट, तपोवन परिसरातील पुरातन मंदिरे आजही पौराणिक काळाची साक्ष देतात. तसेच गावठाण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्या नाशकातील जुनी मंदिरे, मशिदी, दर्गाच्या वास्तू इतिहासाची आठवण करुन देतात. अशाच वास्तूंपैकी एक नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाला लागून असलेली ‘शहाजहांनी ईदगाह’ची वास्तू.
‘शहाजहांनी ईदगाह’ची वास्तू ही देखील ऐतिहासिक आहे. या वास्तूला अनन्यसाधारण महत्व असून वर्षातून दोनदा या ठिकाणी शहर व उपनगरांमधील मुस्लीम बांधव एकत्र येऊन सामुहिकरित्या नमाजपठण करतात.
मुघलकालीन वास्तूंमध्ये या वास्तूचा समावेश होतो. शहरात मुघलकालीन काही मशिदी आहेत. त्यापैकी एक शहाजहांनी मशिद. इसवी सन १६११-१२च्या सुमारास मिर्झा शहाबुद्दीन बेग मुहम्मद खान उर्फ शहाजहांन हे गव्हर्नर असताना नाशिकमध्ये (तेव्हाचे गुलशनाबाद) दोन वर्षे मुक्कामी होते.
तेव्हा त्यांनी शहाजहांनी मशिद आणि शहाजहांनी ईदगाहची निर्मिती केली. या दोन्ही वास्तू सुमारे चारशे वर्षे जुन्या असून तेव्हापासून या ठिकाणी नमाजपठण केले जात असल्याची माहिती हाजी वसीम पिरजादा यांनी दिली. या वास्तुचे बांधकाम दगडी असून मुघल स्थापत्यकलेचे दर्शन बांधकामातून सहज घडते. वास्तुला मध्यभागी दोन लहान मनोरे (मिनार) आहे तर वास्तूच्या दोन्ही टोकांनाही दोन लहान मनोरे उभारण्यात आले आहेत.