चिखलीकरांची चौदा वर्षांत चौदा कोटींची माया

By Admin | Updated: November 26, 2015 23:36 IST2015-11-26T23:35:18+5:302015-11-26T23:36:21+5:30

एसीबीची चौकशी : दोन हजार पानी दोषारोपपत्र

In the fourteen years of Chikhlikar, the fourteen million Maya | चिखलीकरांची चौदा वर्षांत चौदा कोटींची माया

चिखलीकरांची चौदा वर्षांत चौदा कोटींची माया

नाशिक : रस्त्याच्या कामाचा धनादेश देण्यासाठी ठेकेदाराकडून २२ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश मधुकर चिखलीकर यांनी चौदा वर्षांच्या सेवेत सुमारे १४ कोटींची माया जमविल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे़ गुरुवारी (दि़२६) न्यायाधीश एऩ के. ब्रह्मे यांच्या न्यायालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चिखलीकरांसह त्यांची पत्नी व खासगी व्यक्तीविरोधात दोन हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे़
सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केलेल्या रायते ते काकडवळण या रस्त्याचे काम ठेकेदाराने पूर्ण केले होते़ या कामाचा ३ लाख ६९ हजार रुपयांचा धनादेश देण्यासाठी मंजूर बिलाच्या ६ टक्केप्रमाणे २२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती़ लाचेची ही रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ३० एप्रिल २०१३ रोजी त्र्यंबकेश्वर उपविभागाचे शाखा अभियंता जगदीश मगन वाघ यांच्यामार्फत घेतली असताना रंगेहाथ पकडण्यात आले होते तसेच चिखलीकर व वाघ या दोघांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सतीश चिखलीकर यांचे शासकीय निवासस्थान, त्यांच्या पत्नी स्वाती चिखलीकर यांच्या नावे असलेल्या विविध बँकांमधील लॉकरमध्ये रोख रक्कम, सोने अशी एकूण १४ कोटी ६६ लाख १७ हजार ६४६ रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता मिळाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे़ कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर व त्यांची पत्नी स्वाती चिखलीकर यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विशेष न्यायालयात दोन हजार पानी दोषारोपपत्र दाखल केले आहे़(प्रतिनिधी)

Web Title: In the fourteen years of Chikhlikar, the fourteen million Maya