वायगाव येथे चार टन डाळिंबाची चोरी
By Admin | Updated: February 21, 2017 01:44 IST2017-02-21T01:43:53+5:302017-02-21T01:44:11+5:30
लाखोंचे नुकसान : शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण

वायगाव येथे चार टन डाळिंबाची चोरी
द्याने : बागलाण तालुक्यातील वायगाव येथील डाळींब उत्पादक शेतकरी सोपान लोटन सूर्यवंशी यांच्या गट नंबर ७३/२ शेतातील विक्र ीस आलेल्या चार टन डाळिंबाची चोरट्यांनी मध्यरात्री अंधाराचा फायदा घेऊन चोरी केल्याने अंदाजे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. परिसरात चोरट्यांनी आपला मोर्चा शेतीपिकासह ठिबक संच, विद्युत मोटारी, फवारणी यंत्र आदि शेतोपयोगी औजारांकडे वळवला असल्याने शेतकऱ्यांत घबराट पसरली आहे. सूर्यवंशी यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळेही जोपासताना त्यांनी डाळींबबागेवर केलेल्या औषध, रासायनिक खते, सेंद्रिय खते व त्यासाठी सर्व मेहनत छाटणीपासून ते डाळिंबाच्या झाडांना आधार देण्यापर्यंत केलेला सर्व खर्च कर्ज काढून केला होता. दुष्काळजन्य परिस्थितीत त्यांनी टॅँकरमार्फत पाणी विकत घेऊन बाग जोपासली होती. बागेतील डाळींब परिपक्व झाले असून ते विकण्यासाठी व्यापाऱ्यांच्या संपर्कात होते. व्यापाऱ्यांनीही बागेची पाहणी केली. एक ते दोन दिवसात या संपूर्ण डाळींबाची विक्र ी होणार होती. या बागेतून सुमारे चार टन माल निघेल, असा अंदाज व्यापाऱ्यांनीही व्यक्त केला होता. आजचा दर प्रतिकिलो १०० ते ११० रूपयेपर्यंत आहे. १०० रुपये सरासरी मिळेल व आपणास चार ते पाच लाख रूपये मिळतील अशी अपेक्षा होती. परंतु चोरट्यांनी एका रात्रीत पाचशेच्या वर डाळिंब तोडून नेले. ही बाब सूर्यवंशी यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांत रितसर चोरीची तक्र ार दाखल केली आहे. जायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम कोळी, हवालदार मोरे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)
हातातोंडाशी आलेला घास गेला
नामपूर-वायगाव रस्त्यालगत सोपान सूर्यवंशी यांची शेती असून, या शेतात त्यांनी डाळिंबाची बाग जोपासली आहे. तेल्या व मर रोगाशी दोन हात करत डाळिंबाची बाग वाचविण्यासाठी टॅँकरने पाणीपुरवठा करून व फवारणीसाठी हातउसनवार घेतलेले पैसे यांचा ताळमेळ बसवत मोठ्या हिमतीने डाळींबबाग पिकवली होती. बहार आलेले डाळींब विकून हातउसनवार घेतलेले पैसे याची परतफेड करता येईल अशी अशा ते बाळगून होते. चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास डाळींब चोरून नेल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्याने उचललेले कर्ज फेडावे तरी कसे असा प्रश्न सूर्यवंशी यांच्यापुढे उभा आहे.