चार हजार खासगी डॉक्टर संपावर
By Admin | Updated: March 24, 2017 00:36 IST2017-03-24T00:36:28+5:302017-03-24T00:36:40+5:30
नाशिक : मारहाणीच्या निषेधार्थ राज्यस्तरावर पुकारण्यात आलेल्या संपात चार हजार डॉक्टरांनी सहभाग घेतल्याने बुधवारी वैद्यकीय सुविधा कोलमडली.

चार हजार खासगी डॉक्टर संपावर
नाशिक : धुळेपाठोपाठ नाशिकमधील जिल्हा शासकीय रुग्णालयात डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाइकांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ राज्यस्तरावर पुकारण्यात आलेल्या संपात नाशिक जिल्ह्यातील सुमारे चार हजार डॉक्टरांनी सहभाग घेतल्याने बुधवारी वैद्यकीय सुविधा कोलमडली.
बुधवारी रात्रीपासून नाशिकमधील सुमारे चार हजार खासगी डॉक्टरांनी ‘सेवा’ बंद केली असून, संपामध्ये सहभाग नोंदविला आहे. शहरातील विविध रुग्णालयांच्या दारावर काम बंदच्या नोटिसा लावून डॉक्टरांनी बंद पाळला असून, त्यामुळे रुग्णांचे हाल झाले. बंदच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीकडे लक्ष वेधण्यासाठी शहरातील निवासी डॉक्टरांनी निषेध मोर्चा काढला. खासगी डॉक्टरांच्या सेवा बंद असल्याने रुग्णांना सरकारी रुग्णालयांचा रस्ता धरावा लागला. महापालिकेच्या दवाखान्यामध्ये बाह्यरुग्ण तपासणीसाठी गर्दी झाल्याचे दिसून आले. सर्वत्र गर्दी वाढल्याने विशेषत: महिला व वृद्धांची कुचंबणा झाली.
दरम्यान, डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत सरकार गंभीरपणे लक्ष देत नाही व संरक्षण पुरवत नाही तोपर्यंत इंडियन मेडिकल असोसिएशन संपावर ठाम असून, काम बंद ठेवण्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष डॉ. अशोक तांबे यांनी दिला आहे. खासगी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामुळे जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांना २४ तास सेवेसाठी पाचारण करण्यात आले होते. (प्रतिनिधी)