दरोड्यातील चौघे संशयित गजाआड

By Admin | Updated: February 17, 2017 00:36 IST2017-02-17T00:36:21+5:302017-02-17T00:36:34+5:30

दोघे नेपाळचे : प्रवासी रिक्षा पळवून नेऊन दरोडा

Four suspects in the dock | दरोड्यातील चौघे संशयित गजाआड

दरोड्यातील चौघे संशयित गजाआड

नाशिक : रिक्षाचालकास प्रवासी असल्याचे सांगून आडमार्गाला नेऊन मारहाण केल्यानंतर सदर रिक्षा पळवून नेत शहरातील विविध ठिकाणी दरोडा, जबरी लूट, तसेच मारहाण करणाऱ्या चौघा संशयितांना इंदिरानगर पोलिसांनी बुधवारी (दि़१५) रात्री अटक केली़
या संशयितांमध्ये नेपाळचे दोघे, तर जळगाव व नाशिकमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे़ दरम्यान, या चौघांनी ५ फेब्रुवारीला रात्री दहा ते साडेदहा या अवघ्या अर्धा तासात तिघांना जबर मारहाण तसेच धारदार शस्त्राने वार करून लुटल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़
इंदिरानगर पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांमध्ये कुंदन सोमनाथ खैरनार ऊर्फ कुंद्या (१९, रामवाडी), समाधान शांताराम ऊर्फ सीताराम पाटील (२८, रा़ अष्टगंध सोसायटी, जुईनगर, पेठरोड), रमेश मानबहादूर थापा (१९, पंचवटी, मूळ रा़ नेपाळ) व टिकाराम बहादूर डांगी (१९, रा़ विडी कामगारनगर, क. का.वाघ कॉलेजच्या पाठीमागे, आडगाव़, मूळ रा़ नेपाळ) या चौघांचा समावेश आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ५ फेब्रुवारी २०१७ रोजी रात्रीच्या सुमारास अमोल परदेशी (रा़ शिंगवे बहुला, देवळाली कॅम्प) या रिक्षा (एमएच १५, झेड ९२०६) चालकास या चौघा संशयितांनी जयशंकर लॉन्स येथे जायचे आहे, असे सांगितले़ तिथे पोहोचल्यानंतर त्यास प्रवासभाडे न देता बेदम मारहाण करून त्याच्याजवळील ५१० रुपये व रिक्षा पळवून नेली़ यानंतर ही रिक्षा घेऊन संशयित वडाळा गावातील मदार लॉन्स परिसरात गेले़ या ठिकाणी नाजिर अन्सारी या युवकास जबर मारहाण व पाठीवर कुकरीने वार करून जबर जखमी केल्यानंतर दोन हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून पळ काढला़
या चौघा संशयितांनी यानंतर रिक्षा इंदिरानगरच्या मेट्रो झोन गेटसमोरील अंधारात लावून रस्त्याने जात असलेले संकेत निमसे यांना कोयत्याचा धाक दाखवून अडविले़ त्यांच्याकडील मोबाइल व खिशातील पाकिट काढत असताना अचानक निमसे यांचा भाऊ तिथे आल्याचे पाहून निमसे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून रिक्षातून पळून गेले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Four suspects in the dock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.