जागा चार, सत्तावीस दावेदार...
By Admin | Updated: February 15, 2017 00:02 IST2017-02-15T00:02:18+5:302017-02-15T00:02:34+5:30
जागा चार, सत्तावीस दावेदार...

जागा चार, सत्तावीस दावेदार...
नरेंद्र दंडगव्हाळ : सिडको
संमिश्र लोकवस्ती व राजकीय परिस्थिती असलेल्या सिडकोतील प्रभाग क्रमांक २७ मध्ये चार जागांसाठी २७ उमेदवार नशीब अजमावित आहेत. त्यात काका-पुतण्याचा आमने-सामने सामना रंगणार असल्याने येथील लढत चुरशीची झाली आहे.
‘अ’ अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या गटातून सेनेचे विद्यमान नगरसेवक उत्तम दोंदे, भाजपाकडून राकेश दोंदे, राष्ट्रवादीचे प्रकाश (संदीप) वानखेडे, मनसेकडून प्रशांत खरात, बहुजन समाज पक्षाकडून किरण मोहिते, अपक्ष म्हणून राहुल भुजबळ, मनोज दोंदे, संदीप दोंदे, नंदकुमार कर्डक हे नशीब आजमावित आहेत. या गटातच विद्यमान नगरसेवक उत्तम दोंदे व पुतणे राकेश दोंदे हे दोघही आमने-सामने उभे ठाकले आहेत. केंद्रात व राज्यात सत्तेवर असूनही सध्या सेना-भाजपा ज्याप्रमाणे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत, त्याच धर्तीवर या गटात एकाच घरात दोघा दोंदे यांच्यात होणाऱ्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ‘ब’ अनुसूचित जमाती गटातून सेनेकडून चंद्रकांत खाडे, राष्ट्रवादीकडून अमोल कोथे, भाजपाकडून लता मोतीराम पवार, मनसेचे लक्ष्मण वाघ व अपक्ष म्हणून किरण राजवाडे हे पाच उमेदवार एकमेकांसमोर ठाकले आहेत. चंद्रकात खाडे हे भारतीय वन सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी आहेत, त्याच बळावर त्यांची उमेदवारी आहे. या गटातील सर्वच उमेदवार नवखे असल्यामुळे मतदारही संभ्रमात आहेत. ‘क’ नागरिकांचा मागास प्रवर्ग या गटातून शिवसेनेकडून माजी नगरसेवक पुंजाराम गामणे यांची कन्या किरण गामणे (दराडे), भाजपाकडून सोनल शेखर निकुंभ, मनसेकडून संगीता रामदास दातीर, कॉँग्रेसकडून वंदना पाटील, अपक्ष म्हणून सुवर्णा किरण सोनवणे, संध्या नारायण आहेर यांच्यात लढत होणार आहे. सेनेच्या किरण गामणे व भाजपाच्या सोनल निकुंभ व मनसेच्या संगीता दातीर ह्या तिघेही स्वकर्तृत्वापेक्षा कुटुंबातील राजकीय वारशांच्या बळावर उमेदवारी करीत असल्यामुळे एकप्रकारे त्यांच्या कुटुंबीयांचीच प्रतिष्ठापणाला लागली आहे.
‘ड’ सर्वसाधारण महिला गटातून सेनेच्या विद्यमान नगरसेवक शोभा तानाजी फडोळ, कॉँग्रेसकडून संगीता धोंडीराम आव्हाड, मनसेकडून बेबी संजय दातीर, भाजपाकडून कावेरी घुगे, भारतीय संग्राम परिषदेकडून शीतल साहेबराव दातीर, भारिप बहुजन महासंघाकडून मंदाबाई महादू सोनवणे हे उमेदवारी करीत आहेत. सेनेच्या नगरसेवक शोभा फडोळ यांच्याविरुद्ध सर्वपक्षीय उमेदवार असे चित्र असून, गेल्या निवडणुकीत कॉँग्रेसच्या संगीता आव्हाड यांनी फडोळ यांना आव्हान दिले होते, आता यंदा पुन्हा तशीच लढत होत आहे.