चार टक्के साठ्याने धाकधूक वाढली
By Admin | Updated: June 10, 2016 00:04 IST2016-06-09T23:50:12+5:302016-06-10T00:04:40+5:30
पावसाची प्रतीक्षा : टॅँकर अडीचशेच्या घरात

चार टक्के साठ्याने धाकधूक वाढली
नाशिक : हवामान खात्याने वेळोवेळी मान्सून लवकर येण्याचा व्यक्त केलेला अंदाज खोटा ठरल्यामुळे जिल्ह्णातील धरणांमध्ये अवघा चार टक्के पाणी साठा शिल्लक असल्याचे पाहून जिल्हा प्रशासनाची धाकधूक वाढली आहे. पाऊस आणखी लांबला तर अगोदरच अडीचशेच्या घरात पोहोचलेल्या टॅँकरची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्णात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, जानेवारी महिन्यापासूनच काही तालुक्यांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यानंतर नाशिक, कळवण वगळता अन्य तेरा तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची मागणी वाढली, मात्र याच दरम्यान नदी, नाले कोरडे पडून विहिरींनीही तळ गाठला, तर धरणांच्या साठ्यातही कमालीची कमतरता आली. मे महिन्यातच जेमतेत सात टक्के साठा असलेल्या धरणांमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात फक्त चार टक्केच साठा शिल्लक राहिला असून, त्यातच मान्सूनच्या आगमनाची चिन्हे नाहीत.
यंदा मान्सूनचे आगमन लवकर व समाधानकारक होण्याचे भाकीत हवामान खात्याने फार पूर्वीपासूनच व्यक्त केल्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यातच पावसाची दमदार हजेरी लागून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याची अपेक्षा बाळगून असलेले प्रशासन पावसाची चिन्हे दिसत नसल्याने चिंतेत सापडले आहे. पाऊस लांबला तर टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी कोठून उपलब्ध करायचे, असा प्रश्न उभा राहिला आहे. धरणांमधील पाण्याचे शेवटचे आवर्तन मे महिन्याच्या अखेरीस संपले असून, सध्याचा साठा पाहता गंगापूर धरण समूह वगळता अन्य समूहांमध्ये उरलेल्या साठ्यातून पिण्याची गरज भागण्याची शक्यता कमीच आहे.