चार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
By Admin | Updated: January 21, 2017 00:14 IST2017-01-21T00:13:48+5:302017-01-21T00:14:08+5:30
कालिदासची दुरवस्था : आयुक्तांनी घेतली गंभीर दखल

चार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिरातील दुरवस्थेबद्दल अभिनेता प्रशांत दामले यांनी महापालिकेचे वाभाडे काढल्यानंतर आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी त्याची गंभीर दखल घेत चार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. दरम्यान, कालिदासच्या दुरुस्तीची कामे सध्या सुरू असून, दामले यांनी फेसबुकवर टाकलेली छायाचित्रे ही जुनी असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे. महाकवी कालिदास कलामंदिरातील दुरवस्थेबद्दलची काही छायाचित्रे अभिनेता प्रशांत दामले यांनी फेसबुकवर शेअर करत नाराजी व्यक्त केली होती. दामले यांच्या पोस्टवरून सोशल मीडियात असंख्य प्रतिक्रिया उमटल्या आणि अनेकांनी महापालिकेला दूषणे दिली. दरम्यान, आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दामले यांच्या या नाराजीची दखल
घेत कालिदासच्या दुरवस्थेबद्दल अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे अधीक्षक अभियंता उत्तम पवार, सहायक आयुक्त मालिनी शिरसाट आणि आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आणि येत्या आठ दिवसांत त्यावर खुलासा करण्याचे आदेश काढले. कालिदासबद्दल असलेल्या तक्रारींबद्दल पत्रकारांशी बोलताना आयुक्त कृष्ण यांनी सांगितले, कालिदास कलामंदिरात गेल्या काही दिवसांपासून दुरुस्तीचे काम सुरू आहे. खुर्च्या बदलण्याचे काम चालू असल्याने काही जुन्या तुटलेल्या खुर्च्या बाजूला ठेवल्या जातात. त्यामुळे त्याची छायाचित्रे टाकून दुरवस्था झाल्याचे भासविले गेले. आचारसंहितेनंतर कालिदासच्या नूतनीकरणाच्या कामाला आणखी गती येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
संकल्पचित्रही हायजॅक
दामले यांनी कालिदासच्या दुरवस्थेची छायाचित्रे फेसबुकवर टाकल्यानंतर मनसेने त्यावर प्रतिक्रिया देत दामले यांच्यावरच हल्लाबोल केला. शिवाय, कालिदास कलामंदिरचे संकल्पचित्र तयार असल्याचे सांगत त्याबाबतची छायाचित्रेही सोशल मीडियावर फिरत आहेत. दरम्यान, आयुक्तांनी वास्तुविशारद धीरज पाटील यांनी तयार केलेल्या संकल्पचित्रांची माहिती पत्रकारांना दिली. त्यावेळी सदर संकल्पचित्रे ही अगोदरच सोशल मीडियावर फिरत असल्याचे आयुक्तांसह पाटील यांच्या निदर्शनास पत्रकारांनी आणून दिल्यानंतर दोहोंना आश्चर्याचा धक्का बसला.