गोवर्धन गटासाठी चार अर्ज दाखल
By Admin | Updated: February 4, 2017 23:58 IST2017-02-04T23:58:24+5:302017-02-04T23:58:41+5:30
नाशिक तालुक्यात एकूण १५ अर्ज दाखल

गोवर्धन गटासाठी चार अर्ज दाखल
नाशिक : तालुक्यातील चार गट व आठ गणांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवसांपर्यंत चार गटांसाठी मिळून सहा, तर आठ गणांसाठी एकूण सहा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस ‘निरंक’ गेल्यावर शुक्रवारी (दि.३) नाशिक तालुक्यातील चार गट व आठ गणांसाठी मिळून एक अर्ज गटासाठी, तर पाच अर्ज गणांसाठी दाखल करण्यात आले होते. शनिवारी (दि.४) अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी एकूण सहा अर्ज गटासाठी तर एक अर्ज गणासाठी दाखल करण्यात आला. अर्ज दाखल केलेल्यांमध्ये गोवर्धन गटासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून माजी सभापती हिरामण खोसकर यांनी, तर शिवसेनेकडून राहुल अशोक गुंबाडे, राजेंद्र अशोक चारोस्कर, भाऊसाहेब अशोक झोंबाड (शिवसेना) यांचा समावेश आहे. तर गिरणारे गटासाठी हिरामण खोसकर यांच्या स्नुषा अपर्णा वामन खोसकर यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून तसेच भाजपाकडून इंदूबाई बेंडकोळी यांनी तर गोवर्धन गणासाठी तानाजी दामू गडदे (शिवसेना) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये अजिंक्य हेमंत गोडसे, रत्नाकर केरू चुंबळे यांच्यासह एकलहरा गणासाठी सुरेश जगताप, लहवित गणासाठी मंगेश सोनवणे यांच्यासह एकूण पाच जणांचा समावेश होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अद्याप दोन दिवसांचा कालावधी बाकी आहे. येत्या सोमवारपर्यंत (दि.६) उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. ७ फेब्रुवारीला उमेदवारी अर्जांची छाननी व अपील नसल्यास १३ फेब्रुवारी व अपील असल्यास १५ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहे. येत्या २१ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मतदान होणार असून, २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. (प्रतिनिधी)