गिरणारेजवळ चारचाकीलाअपघात; एक ठार, तीन गंभीर
By Admin | Updated: April 25, 2015 01:15 IST2015-04-25T01:15:30+5:302015-04-25T01:15:51+5:30
गिरणारेजवळ चारचाकीलाअपघात; एक ठार, तीन गंभीर

गिरणारेजवळ चारचाकीलाअपघात; एक ठार, तीन गंभीर
नाशिक : गिरणारे-धोंडेगाव रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास भरधाव चारचाकी नाल्यात पडून झालेल्या अपघातात गंगापूररोडवरील सावरकरनगरमधील अंकुश गणेश काळे (२४) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित तीन युवक गंभीर जखमी असून, त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत़ याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंकुश गणेश काळे (२४, सावरकरनगर, गंगापूररोड, नाशिक), अभिमन्यू पराग सूर्यवंशी (१८, रा़ आरटीओ आॅफिसजवळ, मेरी कॉलनी, नाशिक), हितेश भाटिया (गजानन चौक, पंचवटी), कुणाल विधाते (पंचवटी) हे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास व्हर्ना कारने (एमएच १५, डीएस ५१९८) गिरणारेहून कश्यपी धरणाकडे जात होते़ गिरणारेच्या पुढे गेल्यानंतर शिव फाट्याजवळ त्यांची भरधाव कार नाल्यात घुसून अपघात झाला़ हा अपघात इतका भयंकर होता की, गाडीतील एअर बॅगही फुटून गेल्या आणि गाडीतील पुढील दोघेही काच फोडून बाहेर फेकले गेले़ या अपघातात अंकुश गणेश काळेचा जागीच मृत्यू झाला. तो अशोकस्तंभावरील जयहिंद इंजिनिअरिंग वर्कशॉपचे मालक गणेश काळे यांचा एकुलता एक मुलगा आहे, तर अभिमन्यू सूर्यवंशी हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर कॉलेजरोडवरील सुमन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत़ उर्वरित जखमी कुणाल विधातेवर साई हॉस्पिटलमध्ये व हितेश भाटिया याच्यावर केळकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत़ या दोघांच्याही हात आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे़ या अपघाताचे वृत्त कळताच जखमी युवकांच्या नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती़ दरम्यान, या अपघाताची तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़