चार सहकारी बॅँका आर्थिक गर्तेत
By Admin | Updated: November 18, 2015 22:30 IST2015-11-18T22:29:25+5:302015-11-18T22:30:22+5:30
चार सहकारी बॅँका आर्थिक गर्तेत

चार सहकारी बॅँका आर्थिक गर्तेत
नाशिक : जिल्ह्यातील सतरा पतसंस्था आणि चार सहकारी बॅँका नियमबाह्य कामकाज आणि गैरव्यवहारांमुळे आर्थिक अडचणीत असून, सुमारे २५० संचालक व कर्जदार यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती सहकार समितीच्या बैठकीत देण्यात आली.
शासकीय जिल्हास्तरीय कृती समितीची बैठक प्रभारी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात विषयपत्रिका व इतिवृत्तातील सात विषयांवर चर्चा होऊन कायदेशीर कारवाईचा आढावा घेण्यात आला. आर्थिक डबघाईस आलेल्या सहकारी संस्थांबाबत न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा पाठपुरावा करून लवकरात लवकर निकाल व्हावेत, यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. जप्त मालमत्तांची संबंधितांकडून विल्हेवाट लावण्याचा प्रकार रोखण्यासाठी दक्षता घेण्याचे, तसेच कर्ज वसुलीवर भर देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या चर्चेत अशासकीय सदस्य पां. भा. करंजकर, भास्करराव कोठावदे, जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोड, पिंगळे, गोपाळराव मावळे, मनीषा खैरनार आदिंनी भाग घेतला.