साडेआठ हजार उमेदवारांनी दिली एमपीएससी परीक्षा
By Admin | Updated: April 2, 2017 22:18 IST2017-04-02T22:18:04+5:302017-04-02T22:18:04+5:30
शहरातील ३१ परीक्षा केंद्रांवर सुमारे ११ हजार ३३७ उमेदवारांची परीक्षेसाठी तयारी केली होती.

साडेआठ हजार उमेदवारांनी दिली एमपीएससी परीक्षा
नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फ त उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक आदि वर्ग-१ व वर्ग-२ च्या विविध पदांसाठी रविवारी (दि.२) राज्य सेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली. जिल्हा प्रशासनाने शहरातील ३१ परीक्षा केंद्रांवर सुमारे ११ हजार ३३७ उमेदवारांची परीक्षेसाठी तयारी केली होती. मात्र या परीक्षेसाठी अडीच हजारांहून अधिक उमेदवारांनी दांडी मारली.
शहरातील सर्व ३१ परीक्षा केंद्रावर सकाळी ११ वाजता प्रथम सत्रात तब्बल दोन हजार ७२१ उमेदवार गैरहजर होते. त्यामुळे ३१ केंद्रावर आठ हजार ६१६ उमेदवारांनी परीक्षेचा पहिला पेपर सोडविला, तर दुपारी ३ वाजता दुसऱ्या सत्रात आठ हजार ५३० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर २८०७ विद्यार्थी गैरहजर राहिले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जिल्हा प्रशासनांच्या मदतीने ही परीक्षा प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यासाठी ९०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. राज्यभरात दहा हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक, समवेक्षक अशा कामांसाठी नेमणूक करण्यात आली होती. जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या देखरेखीखाली या परीक्षा पार पडल्या. आयोगातून विशेष निरीक्षक, भरारी पथकांनी परीक्षेवर विशेष नजर ठेवली होती.