आढळले आणखी ३६ दांडीबहाद्दर
By Admin | Updated: October 24, 2014 01:04 IST2014-10-24T01:00:48+5:302014-10-24T01:04:18+5:30
आढळले आणखी ३६ दांडीबहाद्दर

आढळले आणखी ३६ दांडीबहाद्दर
नाशिक : रोगराई टाळण्यासाठी नव्या महापौरांनी मोठ्या उत्साहाने स्वच्छता मोहीम हाती घेतली असताना, दांडीबहाद्दर सफाई कामगारांमुळे मोहीम दूरच, कामगारांची हजेरी घ्यावी लागत आहे. मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी ३६ कामगारांनी दांडी मारल्याने महापौर संतप्त झाले आणि त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना तंबी दिली.
शहरात साफसफाईची कामे केली जात नाही अशा तक्रारी आहेत. घंटागाड्या नियमित नाहीत. त्यातच डेंग्यूरुग्णांची संख्या वाढत असल्याने महापौर अशोक मुर्तडक आणि उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी आयुक्तांसमवेत बैठक घेऊन स्वच्छता मोहीम राबविण्याचे ठरविले. बुधवारपासून ही मोहीम सुरू झाली. तथापि, मोहिमेच्या निमित्ताने हजेरी शेडवर भेट देणाऱ्या महापौरांना पहिल्याच दिवशी २२ सफाई कामगारांनी दांडी मारल्याचे आढळले. त्यामुळे या सर्वांना नोटिसा बजावण्याच्या सूचना महापौरांनी केल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी महापौरांनी केलेल्या तपासणीत आणखी ३६ कामगारांनी दांडी मारल्याचे आढळले. त्यामुळे महापौर पुन्हा संतप्त झाले. त्यांनी आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांना बोलावून तंबी दिली असून, संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रणच नसेल तर कर्मचारी कामे कशी करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील स्वच्छता आणि घंटागाडीबाबत अनेक तक्रारी महपालिका तक्रार विभाग तसेच महापौरांकडेदेखील प्राप्त झालेल्या आहेत. याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चादेखील केली होती; परंतु प्रत्यक्ष पाहणीत वस्तुस्थिती समोर आल्यामुळे महापौर संतप्त झाले. त्यांनी याबाबत अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. कर्मचाऱ्यांनी गांभीर्य दाखविणे अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, त्यांनी गोदाघाट आणि परिसराची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केली.