नाशिक : जिल्ह्यात कोरोना रुग्ण घटत असले तरी बळींचे प्रमाण सातत्याने चाळीसहून अधिक राहत आहे. शुक्रवारीदेखील (दि.०४) एकूण ९३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, नवीन बाधितांची संख्या ५८५ इतकी कमी असली तरी बळींची संख्या ४० आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ४,८७० वर पोहाेचली आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी पुन्हा एकदा नाशिक ग्रामीणपेक्षा नाशिक महानगरातील बळींची संख्या अधिक झाली आहे. ग्रामीणला १७, तर शहरात २१ आणि मालेगाव मनपा व जिल्हाबाह्य प्रत्येकी एक याप्रमाणे नागरिकांचा मृत्यू झाला असल्याने बळींच्या प्रमाणात नियंत्रण आणण्यावरच आरोग्य यंत्रणेला लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. नाशिक शहरात काल १९४, ग्रामीणला ३७२, मालेगाव मनपात ८, तर जिल्हाबाह्य ११, असे बाधितांचे प्रमाण राहिले. दरम्यान, जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांचे प्रमाणदेखील १,२७२ वर आले असून, त्यात ग्रामीणचे ६४३, नाशिक शहराचे ३००, तर मालेगाव मनपाचे ३२९ इतके आहे. दरम्यान, एकूण उपचारार्थी रुग्णसंख्या ७,१९८ वर पोहोचली असून, त्यात नाशिक ग्रामीणचे ३,७९७, नाशिक मनपाचे ३,१७६ तर मालेगाव मनपाचे १९६ आणि जिल्हाबाह्य २९ रुग्णांचा त्यात समावेश आहे.