गोदाघाटावर माजी सैनिकांची गस्त

By Admin | Updated: March 15, 2017 22:36 IST2017-03-15T22:36:09+5:302017-03-15T22:36:31+5:30

महापालिका : घाण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

The former soldiers patrol the Godaghat | गोदाघाटावर माजी सैनिकांची गस्त

गोदाघाटावर माजी सैनिकांची गस्त

नाशिक : महापालिकेने गोदावरी नदीच्या प्रदूषणाबाबत आता गांभीर्याने विचार करण्यास सुरुवात केली असून, त्याचाच एक भाग म्हणून गोदाघाटावर आता घाण-कचरा टाकणाऱ्यांवर जबर दंडाची कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी माजी सैनिक गोदाघाटावर गस्त घालणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली आहे.
आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सन २०१७-१८ या वर्षासाठी आपल्या कारकीर्दीतील पहिले अंदाजपत्रक तयार करताना गोदावरी कक्षाची स्थापना करण्याचा व त्यासाठी खास आर्थिक तरतूद करण्याचा मनोदय यापूर्वीच बोलून दाखविला होता. आता आयुक्तांनी त्याचा कृती आराखडाच तयार केला असून, येत्या आठ ते दहा दिवसांत त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार आहे. गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा महापालिकेसाठी नेहमीच डोकेदुखी ठरत आलेला आहे. प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयात काही जनहित याचिकाही दाखल झालेल्या आहेत आणि न्यायालयानेही महापालिकेला त्याबाबत वारंवार फटकारले आहे. त्यामुळेच आयुक्त कृष्णा यांनी गोदावरी नदी प्रदूषणमुक्तीसाठी उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचे पहिले पाऊल म्हणून गोदाघाटावर तसेच नदीच्या पाण्यात घाण-कचरा, निर्माल्य टाकणाऱ्यांवर जबर दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यावर नजर ठेवण्यासाठी सुमारे ८० माजी सैनिकांची नियुक्ती केली जाणार आहे. माजी सैनिकांचे पथक हे तीन सत्रात गोदाघाटावर गस्त घालून कारवाई करणार आहेत. याशिवाय, गोदाघाटावर कपडे, वाहन धुण्यासही मनाई केली जाणार आहे. त्यासाठी ‘नो वॉशिंग झोन’ जाहीर करून उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. मार्च अखेरपासून प्रत्यक्ष कारवाईस सुरुवात होणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

Web Title: The former soldiers patrol the Godaghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.