माजी नगरसेवक गांगुर्डे यांचा संशयास्पद मृत्यू
By Admin | Updated: September 18, 2016 01:18 IST2016-09-18T01:17:58+5:302016-09-18T01:18:13+5:30
हत्त्या की आत्महत्त्या? : पेठ रोडवरील इंद्रप्रस्थनगरी परिसरात आढळला मृतदेह

माजी नगरसेवक गांगुर्डे यांचा संशयास्पद मृत्यू
पंचवटी : शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा पंचवटीतील भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान नगरसेवक ज्योती गांगुर्डे यांचे पती अर्जुन किसन गांगुर्डे (५२) यांचा मृतदेह शनिवारी (दि़ १७) सकाळी १० वाजेच्या सुमारास पेठ रोडवरील इंद्रप्रस्थनगरीच्या समोरील मेघराज बेकरीच्या मागील मोकळ्या भूखंडावर त्यांच्याच वॅगनर कारमध्ये संशयास्पदरीत्या आढळून आला़ या कारमध्ये पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली असून, त्यामध्ये काही ठेकेदारांची नावे असल्याचे वृत्त आहे़ दरम्यान, गांगुर्डे यांच्या शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून, याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
म्हसरूळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पेठ रोडवरील इंद्रप्रस्थनगरी परिसरातील मोकळ्या भूखंडावर एक वॅगनर कार (एमएच १५, सीटी ०९४१) उभी असल्याचे नागरिकांनी बघितले़ गत दोन दिवसांपासून परिसरात फिरणाऱ्या या कारबाबत संशय आल्याने एका इसमाने कारजवळ जाऊन बघितले असता कारचालकाच्या शेजारच्या सीटवर एक इसम झोपलेल्या अवस्थेत आढळून आला़ त्याने ही माहिती तत्काळ म्हसरूळ पोलीस ठाण्यास कळविली़
पेठरोड परिसरात एका कारमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त डॉ़ राजू भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली़ पोलिसांनी वॅगनर कारमधील कागदपत्रांची तपासणी केली असता त्यामध्ये नगरसेवकाचे लेटरपॅड तसेच पक्षाची कागदपत्रे आढळून आली़ या कागदपत्रांवरून हा मृतदेह माजी नगरसेवक अर्जुन गांगुर्डे यांचा असल्याचे समोर आले़ पंचवटीमध्ये ही वार्ता पसरताच आमदार बाळासाहेब सानप हे पदाधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते़
म्हसरूळ पोलिसांनी मृतदेह व कारच्या केलेल्या तपासणीत पाण्याच्या बाटल्या वगळता कोणत्याही प्रकारच्या संशयास्पद वस्तू मिळाल्या नसल्याने गांगुर्डे यांनी आत्महत्त्या केली की त्यांची हत्त्या करण्यात आली, असा पेच निर्माण झाला आहे़ जिल्हा रुग्णालयात गांगुर्डे यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्यांचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे़ मयत गांगुर्डे याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मयत अर्जुन गांगुर्डेअर्जुन गांगुर्डे यांचा मृतदेह ज्या कारमध्ये आढळला त्यामध्येच पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली आहे़ पोलिसांनी जप्त केलेली ही चिठ्ठी गांगुर्डे यांनी पत्नी ज्योती यांना लिहिलेली असून, त्यामध्ये सिंहस्थ कुंभमेळा कामात अडथळा आणला, असा उल्लेख असून, त्यामध्ये तीन-चार ठेकेदारांची नावे असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़ (वार्ताहर)
माजी नगरसेवक अर्जुन गांगुर्डे यांचा मृतदेह त्यांच्याच वॅगनर कारमध्ये सकाळच्या सुमारास आढळून आला़ या कारमध्ये एक चिठ्ठी मिळाली असून, ती तपासासाठी ताब्यात घेतली आहे़ गांगुर्डे यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असले तरी प्रथमदर्शनी हा मृत्यू संशयास्पद असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे़
- लक्ष्मीकांत पाटील, पोलीस उपायुक्त, नाशिक