माजी नगरसेवक बाळासाहेब तिगोटे यांचे निधन
By Admin | Updated: July 28, 2016 01:23 IST2016-07-28T01:16:24+5:302016-07-28T01:23:13+5:30
माजी नगरसेवक बाळासाहेब तिगोटे यांचे निधन

माजी नगरसेवक बाळासाहेब तिगोटे यांचे निधन
नाशिक : नाशिक महापालिकेच्या पहिल्या पंचवार्षिक कारकिर्दीतील नगरसेवक, पॅँथर चळवळीचे नेते बाळासाहेब तिगोटे (५७) यांचे पुणे येथे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, बहीण असा परिवार आहे.
गेल्या महिनाभरापासून तिगोटे हे हृदय आणि अन्ननलिकेच्या विकाराने त्रस्त होते. त्यांच्यावर नाशिकमधील साईबाबा आणि सुविचार हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना पुणे येथील खासगी रूग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच बुधवारी (दि. २७) दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.
पॅँथर चळवळीचे धडाडीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून तिगोटे यांची ओळख आहे. दलितांच्या प्रश्नावर उभारण्यात आलेल्या अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. नाशिकमध्ये बौद्धांच्या प्रश्नांवर झालेल्या आंदोलनासाठी त्यांना कारागृहात जावे लागले. पुणे येथे झालेल्या पॅँथरच्या आंदोलनातही त्यांचा उल्लेखनीय सहभाग होता. एकत्रित रिपाइंचे पहिले परंतु अपक्ष नगरसेवक म्हणून ते नाशिक महापालिकेत निवडून आले. पॅँथरनंतर त्यांनी मासमुव्हमेंट या संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांवर आंदोलने उभारली.
तिगोटे यांनी प्रारंभी मधुकर चित्रपटगृहात काम केले. त्यानंतर त्यांनी इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये काही वर्ष नोकरी केली. परंतु सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी सरकारी नोकरी सोडून सामाजिक कार्यात स्वत:ला
वाहून घेतले. विविध सामाजिक संघटनांवर त्यांनी काम केले आहे. शाहू बोर्डिंगचे ते विद्यमान अध्यक्ष होते. (प्रतिनिधी)