जनप्रबोधनाचा विसर
By Admin | Updated: January 18, 2016 21:59 IST2016-01-18T21:58:12+5:302016-01-18T21:59:51+5:30
मालेगाव : वीज सुरक्षा सप्ताह

जनप्रबोधनाचा विसर
मालेगाव कॅम्प : येथील वीज कंपनीतर्फे वीज सुरक्षा सप्ताह साजरा केला गेला. मात्र शहरात जनजागृतीचा कार्यक्रम राबविण्यात आला नाही. त्यामुळे वीज कंपनीसह त्यांच्या सहकारी विभागांमार्फत सुरक्षा सप्ताह बसनात गुंडाळला गेला असल्याचे चित्र मालेगाव विभागात दिसत आहे.
११ ते १६ जानेवारीदरम्यान वीज कंपनी, इलेक्ट्रिकल विभागासह त्यांच्या सहकारी इतर विभागातर्फे वीज सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या काळात वीज कंपनीसह इतर विभागातर्फे शहरात जनजागृती फेरी, पथनाट्य, सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी वीज सुरक्षाबाबतचे पत्रके, फलक, पोस्टर लावणे अपेक्षित होते. ते शहरात वीज कंपनीच्या कार्यालयाखेरीज कोठेही लावण्यात आले नाही.
वीज कंपनीच्या असंख्य कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी विजेबाबत जनजागृती, माहिती, विजेचा वापर व त्यानुसार सुरक्षा व त्यापासून होणारे नुकसान व इतर बाबींबाबत कुठलीही बैठक वा कार्यक्रम घेण्यात आला नाही. केवळ विद्युत विभागातर्फे काही मोजक्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यात आले.
या सप्ताहामध्ये खरे तर कंपनीतर्फे सप्ताहामध्ये वीज उपकरणे ओल्या हाताने वापरू नये, सर्व साहित्य आयएसआय प्रमाणीत असावेत, वीज वाहक तारांनजीक बांधकामे करू नये, घरात
इलेक्ट्रिक फिटिंग करताना वायरिंग, अर्थिंगचे काम अधिकृत परवानाधारकांकडून करून
द्यावीत, वीज वाहिनीखाली शेतमाल अथवा इतर वस्तू साठवू नये, विद्युत तारा जमिनीवर तुटून पडल्यास त्यास स्पर्श करू नये व त्वरित कंपनीस त्याची माहिती द्यावी, असे आवाहनपर फलक, पत्रके वीज कंपनीच्या काही कार्यालयात लावण्यात आली आहेत. परंतु जनजागृती करणे गरजेचे होते. हेच पत्रके जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक होते; परंतु तसे झाले नाही. त्यामुळे शासनाचा वीजसुरक्षा सप्ताह मालेगावी साजरा झाला की नाही, असा प्रश्न वीज कर्मचाऱ्यांसह शहरवासीयांना पडला आहे. (वार्ताहर)