एस.आर. शिंदे
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : येथील बसस्थानकातून आंतरराज्यीय बससेवा सुरू असते, मात्र त्या तुलनेने स्थानकाच्या विकासाकडे
लक्ष देण्यात आलेले नाही. बसस्थानकातील काही बाबींची डागडुजी करताना परिवहन महामंडळाला पिण्याचे पाणी, प्रवाशांची सुरक्षा आणि आवारात असलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीचा विसर पडल्याने प्रवाशात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
दऱ्या खोऱ्यात वसलेली गावे, खड्डेमय रस्ते, घाटातली वाट काढत उत्पन्नापेक्षा खर्चाचा आकडा अधिक होत असूनही केवळ प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य समोर ठेऊन पेठचे बसस्थानक असुविधांमध्येही तग धरून राहिले आहे. नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्गावर पेठ आगार असल्याने या स्थानकातून आंतरराज्यीय बससेवा सुरू असते. तालुक्यातील वाडी वस्तीसहनजीकच्या त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, सुरगाणा तालुक्यात बसेस धावतात. शिवाय गुजरात राज्यातून ये-जा करणाऱ्या वलसाड, वापी, सुरत, अहमदाबाद याही बसेच पेठ बसस्थानकावरूनच मार्गस्थ होतात.
बसस्थानक परिसरात सुरक्षारक्षक नाहीत मात्र सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. महिला व पुरुषांसाठी ओझरच्या एच.ए.एल. कंपनीच्या सीएसआर निधीतून महिला व पुरुषांसाठी बसस्थानक परिसरात स्वच्छतागृह बांधण्यात आले असून, त्याची देखभाल नगरपंचायतीमार्फत केली जात आहे. शिवाय परिवहन महामंडळाकडून जुने शौचालय तोडून नव्याने बांधकाम करण्यात आले आहे. बसस्थानक परिसरात दोन उपाहारगृह चालविले जातात यामध्ये महाराष्ट्र व गुजरात अशा दोन्ही राज्यांतील प्रवाशांसाठी आवश्यक ते खाद्यपदार्थ उपलब्ध असून, महाराष्ट्र कोरोनाकाळात सुरू केलेली शिवभोजन थाळी ही याच स्थानकात उपलब्ध करून देण्यात आली आहे. बसस्थानकात स्वतंत्र पोलीस चौकी नसल्याने रात्रीच्या वेळी टवाळखोरांचा वावर दिसून येत असल्याने पेठ पोलिसांचे फिरते पथक येत असल्याचे सांगण्यात आले. पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था नाही. प्रथमोचार पेटी उपलब्ध असली तरी त्याचा फारसा वापर होताना दिसून येत नाही. बसस्थानकात माता-बालक यांच्यासाठी स्तनपान कक्षाची (फिडिंग रूम) सोय करण्यात आली आहे.
दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडत असल्याने प्रवाशांना मात्र चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. बसस्थानकाच्या प्रवेशद्वारापासून खड्डे प्रवाशांचे स्वागत करतात. दरवर्षी डागडुजी केली जात असली तरी बसस्थानक परिसर संपूर्ण काँक्रीटीकरण करण्यात यावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
कोट...
पेठ बसस्थानक दुर्गम भागात असल्याने अनेक नैसर्गिक संकटाशी सामना करावा लागत असल्या तरीही प्रवाशांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहोत. पावसाळा संपल्यावर खड्डे भरून घेतले जातील. जास्तीत जास्त प्रवासी बांधवांनी राज्य परिवहन महामंडळाच्या च्या सुरक्षित सेवेचा लाभ घ्यावा.
-स्वप्नील आहिरे, आगारप्रमुख, पेठ
फोटो - १८पेठ बस स्टँड
180921\18nsk_30_18092021_13.jpg
पेठ बस स्थानक