जबरदस्ती : अकरा आदिवासी कुटुंबे विस्थापित

By Admin | Updated: July 7, 2016 00:38 IST2016-07-06T23:50:25+5:302016-07-07T00:38:02+5:30

वनखात्याने भुईमूग शेतीत लावली रोपे

Forcibly: eleven tribal families displaced | जबरदस्ती : अकरा आदिवासी कुटुंबे विस्थापित

जबरदस्ती : अकरा आदिवासी कुटुंबे विस्थापित

नाशिक : राज्यात दोन कोटी वृक्षलागवडीत दुसरा क्रमांक मिळविल्याचा डांगोरा पिटणाऱ्या नाशिकच्या वनखात्याने आदिवासींच्या ताब्यात असलेल्या शेतजमिनीतील भुईमुगाच्या पिकातच रोपे लावून अकरा आदिवासी कुटुंबांना विस्थापित केल्याची बाब नांदगाव तालुक्यात घडली आहे. विशेष म्हणजे अनेक वर्षांपासून जमीन कसत असलेल्या या कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर कोणतेही अतिक्रमण करू नये, असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना वनखात्याने रोपे लावून जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशही धुडकावून लावले आहेत.
नांदगाव तालुक्यातील पिंप्री हवेली या गावी सदरचा प्रकार घडला आहे. गट नंबर ४९८ मधील सुमारे वीस हेक्टर जागेचा ताबा १९८६ पासून अकरा कुटुंबांच्या ताब्यात असून, सध्या या जागेवर शेतकऱ्यांनी भुईमुगाची पेरणी केलेली आहे. वन हक्क कायद्यान्वये या जागेचा ताबा कायमस्वरूपी कसत असलेल्या आदिवासी-बिगरआदिवासी शेतकऱ्यांकडे द्यावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दावाही दाखल करण्यात आलेला आहे. असे असताना १ जुलै रोजी राज्यात दोन कोटी वृक्षलागवड केली जात असताना वनखात्याने साक्री तालुक्यातील मजूर व जेसीबी यंत्र घेऊन या जागेचा ताबा घेतला व त्याठिकाणी भुईमुगाच्या शेतातच खड्डे खणून रोपांची लागवड केली. जमिनीचा ताबा असलेल्या शेतकऱ्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न मोडून काढण्यात आला व त्यांना विस्थापित केले. या संदर्भात २२ जानेवारी रोजीच जिल्हाधिकाऱ्यांनी उपवन संरक्षकांना पत्र पाठवून शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या दाव्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत या जमिनीवर कोणतेही प्रकारचे अतिक्रमण करू नये, असे आदेश दिले आहेत. तथापि, वृक्षलागवडीत विक्रम करण्याच्या नादात वनखात्याने दांडगाई करीत भुईमुगात रोपांची लागवड केली व शेतकऱ्यांना विस्थापित केले आहे.
या संदर्भात मंगळवारी कॉ. राजू देसले यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा ताबा न दिल्यास १३ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोेषणास बसण्याचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Forcibly: eleven tribal families displaced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.