जबरदस्तीने प्लॉटचा कब्जा; महंताला ग्यानदासांची समज
By Admin | Updated: August 9, 2015 22:59 IST2015-08-09T22:58:00+5:302015-08-09T22:59:08+5:30
क्षमायाचना : मकवानांच्या जागेत बारा खालसे

जबरदस्तीने प्लॉटचा कब्जा; महंताला ग्यानदासांची समज
नाशिक : दिगंबर अनी आखाड्याला दिले जाणारे प्लॉट जबरदस्तीने ताब्यात घेणारे निर्मोही आखाड्याचे महामंत्री महंत श्यामसुंदरदास यांना आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी समज देत त्यांच्याकडील प्लॉटचे फेरवाटप केले. यावेळी महंत श्यामसुंदरदास यांनी झाल्या प्रकाराबद्दल क्षमायाचनाही केली.
महापालिकेने उपलब्ध करून दिलेले प्लॉट शनिवारी दिगंबर अनी आखाड्याला वाटप केले जाणार होते. प्रत्यक्ष वाटप करताना साधूंची मोठी गर्दी होऊन अन्य अनी आखाड्यांच्या महंतांनी सदर प्लॉट परस्पर ताब्यात घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. ज्यांच्यासाठी प्लॉट उपलब्ध करून दिले जाणार होते त्यांनी महंत ग्यानदासांकडे मध्यस्थीची विनंती केली होती. त्यानुसार महंत ग्यानदासांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली आणि दिगंबर अनीत सर्व प्रमुख अनींच्या महंतांची बैठक घेतली. त्यात जबरदस्तीने जागा घेणारे महंत श्यामसुंदरदास यांना ग्यानदास यांनी साधू असूनही सहकारी साधूंशी वाद घातल्याबद्दल समज दिली. तेव्हा श्यामसुंदरदास यांनी क्षमा मागितली. त्यानंतर या प्लॉटचे फेरवाटप झाले. बैठकीला दिगंबर अनीचे महंत रामकिशोरदास शास्त्री, निर्वाणी अनीचे महंत धर्मदास, महंत किसनदास, महंत ग्यानदास यांचे उत्तराधिकारी महंत संजयदास, महंत हेमंतदास, महंत भक्तिचरणदास, महंत परमात्मादास, जनार्धनदास यांच्यासह महापालिकेचे कार्यकारी अभियंता बी. यू. मोरे, उपअभियंता पगारे, घोलप आदि उपस्थित होते. दरम्यान, उद्योजक हरिषभाई मकवाना यांनी काठे औद्योगिक वसाहतीतील आपली स्वत:ची जागा उपलब्ध करून दिली असून, त्यात बारा खालशांची व्यवस्था होणार आहे.
दिगंबर अनी आखाड्याला दिलेले प्लॉट जबरदस्तीने घेतल्याबद्दल महंत श्यामसुंदर यांना समज देताना महंत ग्यानदास. समवेत महंत रामकिशोरदास शास्त्री, महंत धर्मदास, महंत किसनदास, भक्तिचरणदास, महंत परमात्मादास आदि.