नाशिकरोड : सौभाग्यनगर येथील जैनम् कलेक्शन या रेडीमेड दुकानात कामाला असलेल्या युवतीला लष्करांच्या अधिकाऱ्यांकडे अनाधिकृत दारू विक्रीबाबत तक्रार केली या कारणावरून कुरापत काढून जबर मारहाण करत विनयभंग व उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दहा जणांविरूद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवळाली कॅम्प कॅथे कॉलनी येथे राहाणारी रिंकी विजय पिल्ले हीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सौभाग्यनगर येथील जैनम कलेक्शन या रेडिमेड कपडयाच्या दुकानात कामाला आहे. कॅथे कॉलनी येथे राहाणाऱ्या रिंकी पिल्ले यांच्या कॉलनीतच क्लारा देविदास सिंग ही आपल्या मुलांसह राहते. क्लारा सिंगची मुले लष्करामध्ये रोजंदारीवर कामाला आहे. क्लारा सिंग ही दारू विक्रीचा व्यवसाय करीत असल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांना समजल्याने महिन्याभरापूर्वी तिच्या मुलांना लष्कराच्या कामातून काढुन टाकले होते. लष्करी अधिकाऱ्यांना दारू विक्री व्यवसाय करीत असल्याची माहिती आमच्या कुटुंबियांनी दिली असा आरोप करत यापूर्वी क्लारा पिल्ले व तिच्या मुलांनी अनेकवेळा वाद घातला आहे. गेल्या मंगळवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रिंकी पिल्ले ही जैनम कलेक्शन येथे काम करीत असतांना क्लारा देविदास सिंग, तिची बहीण आशु बर्वे व मोनी सॅमसंग डेव्हीड या तिघी दुकानात येऊन काहीएक विचारपूस न करता शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. त्यांनी दुकानाच्या बाहेर ओढत नेले. त्यानंतर मोटारसायकलवर आलेल्या जैसीलाल रंगास्वामी फ्रेडीयंग, सॅमसन डेव्हीड, सिद्धार्थ उन्हवणे, अक्षय बर्वे, लाल देविदास सिंग, सेल्वाराज डेव्हीड, अॅलेक्स फ्रेडीयंग यांनी लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण करून उजव्या कानात मारून रक्त काढले. तसेच माझ्या अंगावरील कपडे फाडून मला उचलून नेण्याचा प्रयत्न केला म्हणून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जबर मारहाण करत विनयभंग
By admin | Updated: November 23, 2014 00:20 IST