अन्नसुरक्षा योजना : १५ हजार नावे कमी
By Admin | Updated: January 8, 2016 23:48 IST2016-01-08T23:40:30+5:302016-01-08T23:48:16+5:30
आर्थिक सर्वेक्षणाचा २० हजार व्यक्तींना लाभ

अन्नसुरक्षा योजना : १५ हजार नावे कमी
नाशिक : अन्नसुरक्षा योजनेचा खऱ्या लाभेच्छुकांना लाभ मिळावा म्हणून जिल्हा पुरवठा कार्यालयाने प्रायोगिक तत्त्वावर शहरातील शिधापत्रिकाधारकांच्या केलेल्या आर्थिक सर्वेक्षणात सुमारे ३४१५ शिधापत्रिकाधारक सधन आढळून आल्याने सुमारे १५ हजार व्यक्तींना रेशनमधून धान्य देणे बंद करण्यात आले असून, उलट पक्षी परिस्थिती हलाखीची असतानाही शासन योजनेचा लाभ मिळत नसलेल्या २० हजार नागरिकांना नव्याने या योजनेत समाविष्ट करून त्यांना स्वस्त दरात धान्य मिळणार आहे.
शहरी भागात ५९ हजार वार्षिक उत्पन्न असलेल्या ४५ टक्के नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यात आले असले तरी, बऱ्याच व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न लाखो रुपये असूनही ते शासनाच्या स्वस्त धान्य (पान ७ वर)
योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या. उलट अत्यल्प उत्पन्न असूनही त्यांना या योजनेतून वगळण्यात आल्याने त्यांनाही या योजनेचा लाभ मिळावा म्हणून वेळोवेळी राजकीय पक्ष, संघटनांनी निवेदने, आंदोलने केली. त्याचाच आधार घेऊन जिल्हा पुरवठा अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांनी नाशिक शहरातील रेशन दुकानदारांमार्फत शिधापत्रिकाधारकांचे आर्थिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात ५९ हजार वार्षिक उत्पन्न असलेले, एक किंवा दोन रूमचे पक्के घर असलेल्या शिधापत्रिकाधारकांचा शोध घेण्यात आला, त्याचबरोबर ५९ हजारापेक्षा कमी उत्पन्न व कच्चे घर असलेले परंतु ज्यांना योजनेचा लाभ मिळत नाही अशांनाही यात समावेश करण्याच्या दृष्टीने माहिती गोळा करण्यात आली. त्यानुसार ३४१५ शिधापत्रिकेवरील १५५७६ व्यक्ती सधन कुटुंबातील असल्याचे आढळून आले. या सर्वांना अन्न सुरक्षा योजनेच्या लाभातून वगळण्यात आले; मात्र त्याच वेळी ६६१९ शिधापत्रिकेतील २०९७४ आर्थिक दुर्बल व्यक्तींना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देणे आवश्यक असल्याचेही आढळून आल्याने त्यांचा समावेश योजनेत करण्यात आला.
चालू महिन्यापासून या योजनेतून ज्यांना वगळण्यात आले त्यांचे धान्य बंद करण्यात आले, तर ज्यांना खरोखर याची गरज आहे त्या शिधापत्रिकाधारकांसाठी रेशन दुकानदारांना धान्य उपलब्ध करून देण्यात येणार असून, येत्या आठवडाभरात समारंभपूर्वक लाभेच्छुकांना धान्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
चौकट====
अकरा हजार व्यक्तींचे धान्य बंद
शिधापत्रिकेत नाव असलेल्या व्यक्तींचे आधार क्रमांक गोळा करण्याच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या निर्णयानुसार शहरात अद्यापही २६५६ शिधापत्रिकाधारकांनी आधारची माहिती न दिल्याने पुरवठा कार्यालयाने ११९५३ व्यक्तींचे धान्य बंद केले आहे.