अन्नप्रक्रिया व इलेक्ट्रिकल उद्योगांना वाव
By Admin | Updated: September 12, 2015 23:20 IST2015-09-12T23:18:50+5:302015-09-12T23:20:20+5:30
अन्नप्रक्रिया व इलेक्ट्रिकल उद्योगांना वाव

अन्नप्रक्रिया व इलेक्ट्रिकल उद्योगांना वाव
सातपूर : आॅटोमोबाइल, अन्नप्रक्रिया व इलेक्ट्रिकल उद्योगांना नाशिकमध्ये चांगला वाव असून, जपानी उद्योगांनी नाशिकमध्ये गुंतवणूक करण्याचे साकडे निमा आयमा पदाधिकाऱ्यांनी जपानी कौन्सुलेटला घातले.
निमा आणि आयमा पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईला जाऊन जपानी कौन्सुलेट जनरलची भेट घेतली. यावेळी कौन्सुलेट जनरल आॅफ जपानच्या इकॉनॉमी विभागाचे मिसुकी एगुची, जनरल योशियाकी युटो, चिफ कॉन्सुल योशिमित्सु कवाटा, रिसर्चर युटो सैटो या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी निमाचे अध्यक्ष संजीव नारंग, माजी अध्यक्ष मनीष कोठारी, सरचिटणीस मंगेश पाटणकर, आयात-निर्यात उपसमितीचे अध्यक्ष हर्षद ब्राह्मणकर, मनीष रावल, संदीप भदाणे, आयमाचे माजी अध्यक्ष सुरेश माळी, ज्ञानेश्वर गोपाळे आदिंनी सविस्तर चर्चा केली व प्रेझेंटेशन सादर केले. आॅटोमोबाइल, अन्नप्रक्रिया व इलेक्ट्रिकल उद्योगांना नाशिकमध्ये चांगली संधी असून, जमीन, पाणी, कुशल मनुष्यबळ, रस्ते, रेल्वे यांसारख्या सुविधा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.
नाशिकच्या उद्योगक्षेत्राची सविस्तर माहिती जाणून घेतल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद देत जपानी शिष्टमंडळाने नोव्हेंबर महिन्यात नाशिकला भेट देण्याचे मान्य केले. भेटीअंती गुंतवणुकीबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन जपानी शिष्टमंडळाने निमा आयमा पदाधिकाऱ्यांना दिले, अशी माहिती निमाचे अध्यक्ष संजीव नारंग यांनी दिले. (वार्ताहर)