लोककलावंत विकताहेत भाजीपाला; सरकारी मदत अद्यापही कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:16 IST2021-08-15T04:16:41+5:302021-08-15T04:16:41+5:30
नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या लॉकडाऊननंतर सुरू करण्यात आलेले व्यवसाय अद्यापही स्थिरावू शकलेले नाहीत. त्यात रंगभूमीवर अवलंबून असलेल्या कलावंत आणि ...

लोककलावंत विकताहेत भाजीपाला; सरकारी मदत अद्यापही कागदावरच
नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या लॉकडाऊननंतर सुरू करण्यात आलेले व्यवसाय अद्यापही स्थिरावू शकलेले नाहीत. त्यात रंगभूमीवर अवलंबून असलेल्या कलावंत आणि तंत्रज्ञांना या लॉकडाऊनचा आणि रंगभूमी ठप्प असण्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे रंगभूमीवर अवलंबून असलेल्यांपैकी कुणी भाजीपाला विक्री, कुणी फळविक्री, कुणी मिसळचे हॉटेल, तर कुणी छोटेसे कपड्यांचे दुकान काढून बसले आहेत. मात्र, आधीपासूनच या व्यवसायांमध्ये असलेल्यांचे जिथे कसेबसे चालते आहे, तिथे नव्याने व्यवसायात आलेल्या या रंगकर्मींना तर तारेवरची कसरतच करावी लागत आहे. त्यात शासनाने मदत देण्याचे जाहीर केले असले तरी त्याबाबतचा अध्यादेश अद्यापही निघालेला नसल्याने ती मदत अद्याप कागदावरच राहिली आहे.
लॉकडाऊननंतर सारे काही खुले होत आहे. अगदी हॉटेल्सनादेखील रात्री दहापर्यंत परवानगी देण्यात आली असली तरी रंगभूमी सुरू होऊ शकलेली नाही. त्यामुळे रंगभूमीचा लॉकडाऊन अद्यापही संपलेला नसल्याने तिथे काम करणाऱ्या बॅकस्टेज कलाकारांचे भविष्यच अंधकारमय झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवहार ठप्प झाल्याने अनेक रंगकर्मींचाही हक्काचा रोजगार बुडाला. त्यात अगदी तरुण गटासह ज्येष्ठ नागरिक श्रेणीतील रंगकर्मींचादेखील समावेश आहे. त्यांनी प्रारंभीचे दोन-तीन महिने कसेबसे काढले. मात्र, त्यानंतर कुटुंबाची गुजराण करणेदेखील शक्य नसल्याने कुणी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला, कुणी कपडे विक्री सुरू केली, कुणी मिसळचे हॉटेल, तर कुणी मिळेल ते काम करू लागले. या नवीन कामाच्या व्यापामुळे आणि पोटपाण्याच्या चिंतेमुळे त्यांना रंगभूमीचे पुन्हा दर्शनदेखील दुर्लभ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या जीवनावरच बॅकस्टेजप्रमाणेच अंधारी आणि काळोखाच्या भीषणतेची दाहकता अधिकच गडद होऊ लागली आहे.
इन्फो
मदतीचा निकष काय ?
शासनाकडून पाच हजारांची मदत मिळणार असे ऐकले आहे. मात्र, ही मदत कुणाला मिळणार तसेच त्यासाठीचा निकष काय आहे, त्याचीही बहुतांश रंगकर्मींना अद्याप माहिती नाही. तसेच त्या रकमेच्या मोबदल्यात शासन संबंधित कलाकारांकडून काही प्रबोधनपर कार्यक्रम करुन घेणार आहे. अशा परिस्थितीत मग ती मदत आहे की कामाच्या मोबदल्याच्या रुपात मिळणार, त्याबाबतही निश्चित माहिती रंगकर्मींना नाही.
इन्फो
राज्य शासनाची मदती कधी मिळणार
राज्य शासनाने मदतीचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर त्याबाबत शासन अध्यादेश काढण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडून यादी उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील सर्व गरजू कलावंत, तंत्रज्ञांची यादी जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध करून दिल्यानंतरच ती मदत संबंधितांपर्यंत पोहोचू शकणार आहे.
---------
कोरोनामुळे संपूर्ण जीवनाची घडीच विस्कळीत झाली होती. प्रारंभीचा काही काळ काय करायचे तेच समजत नव्हते. अखेरीस मी थोडेसे कर्ज काढून गावातच जनरल स्टोअर्सचे दुकान सुरू केले आहे.
किशोर अलई, तंत्रज्ञ
लॉकडाऊननंतर आम्हाला काम मिळणेच बंद झाले. त्यामुळे अखेरीस भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यामुळे आता किमान कुटुंबासाठी कुणापुढे हात पसरायची तरी वेळ येत नाही.
नीलेश कंकरे, कलाकार
फोटो
चार फोटो ११नावाने