जिल्ह्यात चारा टंचाईचे सावट
By Admin | Updated: October 10, 2015 22:06 IST2015-10-10T22:05:29+5:302015-10-10T22:06:29+5:30
दुष्काळ : पिके करपली; डाळींबबागा उखडल्या; जनावरांची उपासमार

जिल्ह्यात चारा टंचाईचे सावट
पिंपळगाव वाखारी : दुष्काळामुळे परिसरात चाराटंचाई निर्माण झाली असून, टंचाईवर उपाययोजना म्हणून महसूल विभागाकडून शेतकऱ्यांच्या जनावरांची व शेती क्षेत्राची माहिती मागवली होती, परंतु याला महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला असूनही अद्याप कुठलीही कार्यवाही नसल्याने मागवलेली माहिती निव्वळ फार्स ठरण्याची चर्चा पशुपालक व शेतकऱ्यांत व्यक्त होत आहे.
पाण्याअभावी खरिपातील सर्वच पिके करपली आहेत. जनावरांसाठी चाराटंचाईचे भीषण संकट शेतकरीवर्गासमोर उभे राहिले आहे. याबाबत गावस्तरावर चारा छावणी तयार करून जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याची मागणी पशुपालक शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे प्रत्येक दुष्काळग्रस्त गावातून शेतकऱ्यांची दुभत्या व खाटे जनावरांची व शेती क्षेत्राची माहिती मागविली होती.
दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी आपली माहिती अर्जांद्वारे गाव पातळीवर तलाठ्याकडे दिली; परंतु अद्याप शासनस्तरावर कोणतीही कार्यवाही नाही. दिवसेंदिवस चाराटंचाईचे संकट वाढत असून, शासन यंत्रणा मात्र सुस्त आहे. मागवलेले अर्ज हे निव्वळ फार्स ठरू नये, अशी अपेक्षा पशुपालक शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
डाळींब परिसरातील एक मुख्य पीक म्हणून ओळखले जाते. या पिकाला तेल्यारोगाचे ग्रहण लागले. तेल्याचे आक्रमण रोखताना डाळींब उत्पादकांच्या नाकीनऊ आले. काही शेतकरी त्यापासून बचाव करत थोडेफार उत्पादन घेण्यात यशस्वी झाले होते. परंतु छोट्या व मध्यम शेतकऱ्यांना तेल्याचे आक्रमण रोखणे अशक्य झाल्याने खर्च अधिक व उत्पादनशून्य अशी अवस्था झाली. त्यामुळे अनेकांनी डाळींबबागा उखडून टाकल्या आहेत. सध्या परिसरात डाळींबबागांवर तेल्याबरोबर प्लेग रोगाचे आक्रमण झाले असून, तयार फळे गळून पडत आहे. यामुळे फळांचे मोठे नुकसान होत असल्याने डाळींब उत्पादकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)
डाळिंबावर प्लेगचे सावट
पिंपळगाव वाखारी : परिसरातील डाळींबबागांना तेल्या रोगाच्या आक्रमणाबरोबर आता प्लेग रोगाचेही आक्रमण सहन करावे लागत आहे. त्यामुळे डाळींब उत्पादक धास्तावले आहेत. अनेक डाळींब उत्पादकांना त्यामुळे उत्पादनापेक्षा खर्चच अधिक करण्याची वेळ आल्याने बहुतेक शेतकरी डाळींब बागांना रामराम करण्याच्या तयारीला लागले आहेत.
रब्बीच्या आशा धूसर
पिंपळगाव वाखारी : परिसरात पाण्याअभावी रब्बीच्या आशा मावळल्याने शेतकरीवर्गामध्ये कमालीची अस्वस्था निर्माण झाली आहे. यंदा खरिपाबरोबर रब्बीही हातातून निसटत असल्याने परिसरातील शेती व्यवसाय धोक्यात आला आहे.
पाऊस न पडल्याने परिसरात यंदा भीषण दुष्काळीस्थिती आहे. खरिपाची संपूर्ण पिके करपून वाया गेली आहेत. परतीचा पाऊस समाधानकारक बरसल्यास रब्बी होईल या आशेवर असणार्या शेतकर्यांना परतीच्या पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे परिसरात भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. आतापासूनच पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. शेतकरीवर्गात खरीप व रब्बी असे दोन्ही हंगाम वाया गेल्याने कमालीची अस्वस्था वाढली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.